उष्माघाताने घेतला तीनवर्षीय बिबट्याचा बळी! दानापूर शिवारात सापडला मृतदेह

वर्धा : आर्वी तालुक्‍यातील चांदणी दानापूर शिवारात राखीव वन क्षेत्र क्रमांक १७० मध्ये एका तीन वर्षें वयोगटातील नर बिबट्याचा मृतदेह रविवारी सकाळी सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. मृत बिबट्याचे त्रिसदस्यीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमूने शवविच्छेदन केले असून, वाढत्या तापमानामुळे या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज त्यांच्याकडून वर्तविण्यात आला आहे. असे असले तरी. सखोल शवविच्छेदन अहवालानंतरच या बिबट्याच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

वर्धा आर्वी मार्गावर आर्वी तालुक्यात चांदणी दानापूर हे गाव आहे. याच गावापासून काही अंतरावर १७० क्रमांकाचे राखीव वनक्षेत्र आहे. याच राखीव वनक्षेत्र परिसरात बिबट्याचा मृतदेह असल्याचे परिसरातील काही नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी याची माहिती ग्रामस्थांना देत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. माहिती मिळताच आर्वी येथील वनपरिक्षेत्र अधिकारी नितीन जाधव यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळ गाठून बिबट्याचा मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला. शिवाय त्रिसदस्यीय पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या चमृद्वारे मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. त्यानंतर या मृत बिबट्याला वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पंच व मानद वन्यजीव संरक्षकांच्या उपस्थितीत अग्नी देण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here