
वर्धा : बजाज सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहात त्या दिवशी केवळ एका व्यक्तीचा सत्कार नव्हता; तो होता संघर्ष, चिकाटी आणि आत्मविश्वासाने यश प्राप्त केलेल्या एका युवतीच्या प्रेरणादायी प्रवासाचा सन्मान. महाराष्ट्रातील पहिल्या मुस्लिम महिला IAS अधिकारी म्हणून 142 व्या क्रमांकाने यश मिळवणाऱ्या अदीबा अनम यांचा वर्ध्यात उत्साहात सत्कार करण्यात आला. यवतमाळ जिल्ह्यातून आलेल्या अदीबा अनम यांनी UPSC परीक्षेचा चार वेळा सामना केला. तीन वेळा अपयश आलं, पण चौथ्या प्रयत्नात त्यांनी इतिहास घडवला. त्या म्हणाल्या, खूप वेळा प्रश्न पडले, मनात शंका निर्माण झाल्या, पण प्रयत्न थांबवले नाहीत. यश हे नेहमी चिकाटीच्या शेवटीच मिळतं.
हा प्रेरणादायी सत्कार कार्यक्रम महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा व शहर शाखा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, पदाधिकारी पाटील सर, फुलमाळी, ॲड. नंदकुमार वानखेडे यांच्या हस्ते अदीबा अनम यांचा शाल, पुष्पगुच्छ आणि अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेच्या विशेष अंकाद्वारे सत्कार करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून वर्धा जिल्हा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ. अभ्युदय मेघे उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन ‘सोशल एज्युकेशन अँड वेल्फेअर असोसिएशन (सेवा)’ आणि शहरातील विविध सामाजिक संस्थांच्या संयुक्त पुढाकाराने करण्यात आले.
गजेंद्र सुरकार यांनी शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कार्यावर प्रकाश टाकत अदीबा अनम यांचे समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी होणारे योगदान महत्त्वाचे असल्याचे नमूद केले. सभागृहात उपस्थित असलेल्या तरुणाईसाठी अदीबा अनम यांनी अपयशाचा स्वीकार, मानसिक दबाव, आणि सतत होणाऱ्या अपेक्षांवर कशी मात केली, हे मनमोकळेपणाने सांगितले. “स्वतःवर विश्वास ठेवा, प्रयत्न करत रहा, यश नक्कीच गवसतं,” हे त्यांचे अंतिम शब्द, अनेकांच्या डोळ्यात चमक घेऊन गेले.



















































