

समुद्रपूर : तालुक्यातील किन्ही (खर्डा) येथे सोमवार 3 जानेवारीला मुख्याध्यापक बोबडे यांच्या अनियमितेमुळे विद्यार्थ्यांना शिकवण्यात अडथळे निर्माण होत असल्याने याची दखल घेत प्रहार व ग्रामस्थांच्यावतीने जि. प. प्राथमिक शाळेवर कुलूपबंद आंदोलन करण्यात आले. अनियमितता व शाळेवर उशिरा हजर होणे या सर्व बाबी गावकऱ्यांच्या निदर्शनास आल्या. यांसदर्भात शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व समस्त गावकरी यांनी बोबडे यांच्या विरोधात गटविकास अधिकारी यांच्याकडे 20 डिसेंबर 2021 ला तक्रार केली होती.
या तक्रारींकडे लक्ष देण्यास त्यांनी टाळाटाळ केली असल्यामुळे समस्त गावकऱ्यांना आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली. अखेर जि. प. प्राथमिक शाळेवर कुलूपबंद आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रहार सेवक देवा धोटे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन महल्ले, उपाध्यक्ष सुवर्णा अंद्रस्कर, पोलिस पाटील चंद्रकांत धोटे, अविनाश भोंगारे, घनश्याम नागपुरे, चेतन धोटे, चेतन डाखोरे, रोशन भोयर, मंगेश धोटे व बालयुवा ध्यान प्रार्थना मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.