फायनान्स कंपन्यांकडून ग्राहकांची लूट! अनेकांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर

वर्धा : ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीचा फायदा घेत काही खाजगी फायनान्स कंपन्यांनी व्याजाच्या नावाखाली दामदुप्पट दराची आकारणी करीत ग्राहकांची लूट चालविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. खाजगी फायनान्स कंपनीच्या या मनमानी कारभाराला नागरिकही कंटाळले असून वसुलीच्या नावाखाली अनेकांना वेठीस धरले जात आहे. यात ग्रामीण भागातील नागरिक भरडल्या जात असून अनेकांचे संसार उद्धवस्त होण्याच्या मार्गावर आहे.

खाजगी फायनान्स कंपन्यांनी ग्रामीण भागातील लोकांना तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्याच्या नावाखाली ग्रामीण भागात आपले जाळे पसरवले आहे. यासाठी काही एजन्टची नेमणूक करण्यात आली आहे. या एजन्टकरवी लोकांना त्याचे घर गहाण करून तत्काळ कर्ज उपलब्ध करुन देण्यात येत असले तरी मनमानी पद्धतीने अव्वाच्या सव्वा व्याजाची आकारणी करीत असल्याने लोकांचे कंबरडे मोडले आहे. नियमित हप्ता भरूनही मोठी थकबाकी दर्शवली जात असन वसुलीच्या नावाखाली अनेकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे अनेकांवर घरदार सोडून जाण्याची वेळ आली आहे. वसुली न देणार्यास घराबाहेर हाकलून लावण्याची धमकी दिली जात आहे. असाच काहीसा प्रकार एका खाजगी फायनान्स कंपनीच्या बाबतीत उघडकीस आला आहे.

घोराड येथील एका तरुणाने घरावर हाऊसिंग फायनान्सच्या नावाखाली अडीच लाख रुपयांचे कर्ज घेतले. त्याने ठरवून दिल्याप्रमाणे 29 हप्ते नियमीत भरले. आतापर्यंत त्याने 2 लाख 90 हजार रुपयांचा भरणा केल्यावर त्याच्याकडे 7 लाखाच्या वर थकबाकी दाखवली जात आहे. तिप्पट रकमेच्या वर व्याजाच्या नावाखाली वसुली करण्याचा हा प्रकारा खाजगी सावकारीसारखा असून यावर शासनाचा अंकुश नसल्याचे दिसन येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here