
हिंगणघाट : अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला चार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास सहा महिने साध्या कारावासाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीडञा आर. एम. माजगावकर यांनी ठोठावली. प्राप्त माहितीनुसार, १३ मार्च २०१७ रोजी पीडित अल्पवयीन मुलगी घरी अभ्यास करीत असताना आरोपी पिंटू ऊर्फ नीतेश खुशाल धोटे रा. उंबरी (वेडे) याने घरात प्रवेश करीत पीडित तिचा विनयभंग केला. पीडिता ओरडल्याने तिच्या आईने धाव घेतली असता आरोपी पिंटूने तेथून पळ काढला.
त्यानंतर पीडित युवतीने घडलेला प्रकारा आईकडे सांगितला. धक्कादायक बाब माहिती पडताच पीडिता व तिच्या आईने पोलीस स्टेशन गाठून पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला १८ मार्च २०१७ रोजी अटक केली. शिवाय संपूर्ण तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ठ केले. हे प्रकरण येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणीला आले. या प्रकरणाचा बुधवारी निकाल लागला असून, आरोपी पिंटूला चार वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. पीडित युवतीच्या वतीने सरकारी अभियोक्ता दीपक वैद्य यांनी युक्तिवाद केला. या प्रकरणात एकूण आठ साक्षीदार तपासण्यात आले. पैरवी अधिकारी म्हणून जमादार विनोद कांबळे यांनी काम पाहिले.