
वर्धा : जुन्या वादाचा वचपा काढत चौघांनी व्यक्तीवर जीवघेणा हल्ला करीत त्यास गंभीर जखमी केले. ही घटना मांडगाव ते सुजातपूर रस्त्यावर घडली. या प्रकरणातील तिघांना हिंगणघाट पोलिसांनी अटक केली असून एका आरोपीचा शोध पोलीस घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ज्ञानेश्वर मारोतराव खातदेव रा. सुजातपूर आणि आरोपींचे शेत हे मांडगाव शिवारात आहे. अडीच महिन्यांपूर्वी आरोपी अतुल यादवराव हिवंज याच्या शेतातील बंडा जळाल्याने त्याने ज्ञानेश्वरच जाळल्याचा संशय घेतला होता. तसेच त्यांच्यात येण्या जाण्याच्या जागेच्या कारणातून नेहमीच वाद होत होता. ज्ञानेश्वर हा शेतातून पायदळ सुजातपूरकडे जात असताना आरोपी अतुल हिवंज, अरुण चावरे, रोशन हिवंज,रोशन चावरे यांनी त्यास रस्त्यात अडवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
तसेच सळाखीने डोक्यावर जबर मारहाण करीत गंभीर जखमी केले, जखमी ज्ञानेश्वरला हिंगणघाट येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. पण, प्रकृती नाजूक असल्याने त्यास सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी याप्रकरणी अतुल हिवंज, अरुण चावरे आणि रोशन चावरे यास अटक केली असून रोशन हिवंज याचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

















































