

हिंगणी : संचारबंदीत दिलेली मुदत संपल्यावरही फळ विक्रीचे दुकान सुरू ठेवल्याच्या कारणातून झालेला वाद विकोपाला जाऊन चाकूहल्ला करण्यात आला. यात गजानन देवराजी मोहरले हा युवक जखमी झाला. ही घटना स्थानिक वॉर्ड क्रमांक ५ मध्ये घडली. हबीब शेख (५०) हा हातगाडीवर फळ विक्री करतो. त्याने ११.३० वाजेपर्यंत दुकान सुरू ठेवल्याने त्याला विचारणा करण्यात आली. त्यानंतर गजानन मोहरले याच्यावर हबीब शेख, सोहेल शेख, इसराईल शेख याने चाकूहल्ला करून गजानन याला गंभीर जखमी केले. या घटनेमुळे गावात चांगलीच खळबळ उडाली आहे.
याच घटनेच्या अनुषंगाने गावात कुठलाही तणाव निर्माण होऊ नये या उद्देशाने माहिती मिळताच सेलूचे तहसीलदार महेंद्र सोनवणे, सेलूचे ठाणेदार सुनील गाढे, सेलू पंचायत समितीचे सभापती अशोक मुंडे, अशोक डेकाटे, जिल्हा परिषद सदस्य राणा रणनवरे, सरपंच दामिनी डेकाटे यांनी घटनास्थळ गाठले. शिवाय गावात शांतता बैठक घेण्यात आली. याप्रकरणी सेलू पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सेलूचे ठाणेदार सुनील गाढे यांच्या मार्गदर्शनात सेलू पोलीस करीत आहेत.