कोरोनाकोप! अंत्यसंस्कारावर पालिकेचे ३४.५५ लाख खर्च; सध्या मोजावे लागताहेत मृताच्या कुटुंबीयांना २ हजार ५०० रुपये

वर्धा : जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण १० मे रोजी सापडला. त्यानंतर जिल्ह्यातील कोविड बाधितांची तसेच कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. कोविडची दुसरी लाट उच्चांकी गाठत असताना म्हणजेच ७ मे पर्यंत वर्धा नगरपालिका प्रशासनाने वर्धा येथील वैकुंठधामात तब्बल एक हजार ३८२ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केले. यासाठी पालिकेला ३४ लाख ५५ हजारांचा खर्च आला आहे. कोविड मृतांवर अंत्यसंस्कार परवडणारा नसल्याने सध्या कोविड मृताच्या कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेतले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार, वर्धा येथील वैकुंठधामाचा कंत्राट एका खासगी संस्थेला देण्यात आला आहे. याच खासगी संस्थेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केले जात आहेत. या खासगी संस्थेला एका कोविड बाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिका प्रशासनाने सुरूवातीला २ हजार ५०० रुपये देण्याचे निश्चित केले. पण नंतर कोविड मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढल्याने व हा खर्च वर्धा नगरपालिका प्रशासनाला न झेपणारा असल्याने सर्वसंमतीने कोविड मृताच्या कुटुंबियांकडून अंत्यसंस्कारासाठी २ हजार ५०० रुपये घेण्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ७ मे पर्यंत १ हजार ३८२ कोविड मृतांवर अंत्यसंस्कार केल्यामुळे या खासगी संस्थेने पालका प्रशासनाकडे देयक सादर केले आहे. या देयकापैकी काही देयक पालिका प्रशासनाने खासगी संस्थेला दिले आहे. तर उर्वरित देयक वेळीच दिले जाणार असल्याचे सांगण्यात आले.

एका अंत्यसंस्काराचा खर्च २,५००

वर्धा नगरपालिका प्रशासनाने एका मृत कोविड बाधितावर अंत्यसंस्काराचा खर्च २ हजार ५०० रुपये निश्चित करून त्याच प्रमाणे १ हजार ३८२ मृत कोविड बाधितांवर अंत्यसंस्कार केला म्हणून ३४ लाख ५५ हजार रुपये कंत्राट दिलेल्या संस्थेला देण्याचे निश्चित केले आहे. तर मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांकडूनही तितकीच रक्कम सध्या घेतली जात आहे.

उपलब्ध होतेय सरण

एका मृत कोविड बाधितावर अंत्यसंस्कार करण्यासाठी पालिकेने नियुक्त केलेली खासगी संस्था साडेसात मन जलावू लाकूड, ५० गोवऱ्या तसेच साडेपाच लिटर डिझेल उपलब्ध करून देते. याच साहित्यासाठी मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांकडून पालिकेने दिलेल्या सूचनांना केंद्रस्थानी ठेवून २ हजार ५०० रुपये घेतले जात आहे. विशेष म्हणजे याची पावती वैकुंठधामात कार्यरत असलेले कर्मचारी मृत कोविड बाधिताच्या कुटुंबियांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here