व्हेंटिलेटर्सचा आरोग्य यंत्रणेने योग्य उपयोग करावा : उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

वर्धा : पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने राज्यात प्रत्येक जिल्ह्यात अत्याधुनिक व्हेंटिलेटर्स वाटप करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने या व्हेंटिलेटर्सचा योग्य उपयोग करावा, कोणत्याही इतर खाजगी रुग्णालयांना ते हस्तांतरित करू नये अशा सूचना उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी व्हेंटिलेटर्स लोकार्पण प्रसंगी दिल्यात.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सचिन तडस यांना मंत्री उदय सामंत यांनी 3 व्हेंटिलेटर्स वितरित केले. यावेळी जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार, माजी खासदार अनंत गुढे, शिवसेना जिल्हाध्यक्ष अनिल शिवतारे, प्रशांत शहागडकर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ नाईक उपस्थित होते.

यावेळी श्री सामंत म्हणाले, मुख्यमंत्री राज्यातील सर्व जिल्हाधिकारी यांच्याशी समनव्य ठेऊन कोरोनाचा लढा देत आहेत. वर्धा जिल्ह्याचा कोरोनाच्या काळातील पॉझिटिव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा पुढे गेला होता. तो आता 5 टक्क्यांच्या आत आहे. कोरोना रुग्ण व्हेंटिलेटरवर जाऊ नये यासाठीच डॉक्टरांनी प्रयत्न करावेत असेही ते म्हणाले.

दुसऱ्या लाटेचा जसा आपण सामना केलात तशीच तयारी तिसरी लाट येणारच नाही यासाठी केली पाहिजे. तिसरी लाट ही लहान मुलांना जास्त बाधित करणार आहे असे तज्ञांचे मत आहे. याला प्रतिबंध करताना आपण पूर्वीपासूनच तयारीत असले पाहिजे अशी महाराष्ट्र शासनाची भूमिका आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रशासनसोबत काम करताहेत.
वैद्यकीय सेवा केवळ मेट्रो सिटी मध्ये पोहचुन उपयोगाची नाही तर ती राज्यात सर्व जिल्ह्यात पोहचली पाहिजे हा उद्देश मुख्यमंत्री महोदयांचा आहे. त्यासाठी पक्ष म्हणून आम्हीही प्रयत्न करीत आहोत असेही श्री सामंत यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here