
खरांगणा (मो.) मुसळधार पावसादरम्यान वीज कोसळल्याने शेतकरी ज्ञानेश्वर लाडेकर (वय ५५) हे जखमी झाले. जखमी शेतकऱ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
रविवार सायंकाळपासून परिसरात थांबून थांबून पाऊस होत आहे. अशातच सोमवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मेघगर्जनेसह पाऊस सुरू असताना वीज कोसळली. यात ज्ञानेश्वर लाडेकर हे जखमी झाले. ज्ञानेश्वर जखमी झाल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांच्या मदतीने त्याला सुरुवातीला मोरांगणा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला वर्धा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
ज्ञानेश्वर यांनी अभय सकांडे यांच्या मालकीचे मोरांगणा शिवारातील शेत ठेक्याने केले आहे. ते शेतात असताना अचानक पावसाला सुरुवात झाली. अशातच ज्ञानेश्वर यांनी पावसापासून बचावासाठी मचाणीचा आधार घेतला. दरम्यान वीज मचाणीवर पडल्याने ज्ञानेश्वर जखमी झाले.



















































