बहिणीचा मृतदेह दिसताच उडाले होश! नागपूर रस्त्यावरील अपघात; वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल

वर्धा : तुमच्या बहिणीचा अपघात झाला आहे. मृतदेह रस्त्याकडेला पडलेला आहे, असे फोनवरून कळताच भावाच्या पायाखालची जमीनच सरकली. अपघातस्थळी जाऊन पाहणी केली असता, बेशुद्ध अवस्थेत ती पडून होती. रुग्णलयात नेले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. हा अपघात नागपूर-यवतमाळ रस्त्यावरील प्रगती नगर परिसरात २७ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास झाला.

लता मसराम असे मृतक महिलेचे नाव आहे. लता ही भाऊ शरद मारोतराव मसराम (रा. नटाळा, पुनर्वसन कारला रोड) याच्या घरी असताना तिच्या मोबाइलवर कामावरील बाईने स्वयंपाकाचे ऑर्डर असल्याचे सांगितले. काही वेळाने लता ही घरून डबा घेऊन नटाळा येथून रिंग रोडकडे जाण्यासाठी पायदळ निघाली. थोड्या वेळाने शरदच्या मोबाइलवर एका महिलेचा फोन आला आणि तुमच्या बहिणीचा अपघात झाला असून, ती रस्त्यावर निपचित पडून असल्याची माहिती दिली.

घाबरलेल्या शरदने लगेच अपघातस्थळी धाव घेत पाहणी केली असता, लता रस्त्याकडेला पडून होती. डोक्याला मार लागल्याने रक्तस्त्राव सुरू होता. लताला लगेच रुग्णवाहिकेतून जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. अज्ञात वाहनचालकाने रस्ता ओलांडत असताना लताला जबर धडक दिल्याने तिचा मृत्यू झाल्याची तक्रार शरद मसराम याने रामनगर पोलिसात दाखल केली असून, पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here