वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या ऑनलाईन सेवेचा लाभ घ्यावा! तांत्रिक अडचणीसाठी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन

वर्धा : उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहन परवाना व वाहनासंबंधींची इतर सेवा ऑनलाईन सुरु करण्यात आलेली आहेत. त्यामुळे नागरिकांनी विहीत शुल्कासह ऑनलाईन अर्ज करुन अर्जाची प्रत कार्यालयास सादर करावी. याबाबत काही तांत्रिक अडचणी असल्यास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांचेशी संपर्क साधावा.

कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मो. समीर मो. याकूब यांनी केले आहे. नागरिकांनी शिकाऊ अनुज्ञप्ती करीता www.parivahan.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करुन तसेच शुल्क भरणा करुन घरबसल्या शिकाऊ अनुज्ञप्ती प्राप्त करुन घ्यावी.

पक्के अनुज्ञप्ती करीता ऑनलाईन अर्ज करुन आपल्या सोईनुसार पुर्व नियोजित तारिख निवडावी व वाहन चाचणी करीता सालोड येथे उपस्थित राहावे. पक्के अनुज्ञप्ती अर्जदारांना घरपोच प्राप्त होणार आहे. अनुज्ञप्ती नुतणीकरणाकरीता ऑनलाईन अर्ज करुन तसेच विहीत शुल्काचा भरणा करुन मुळ अनुज्ञप्तीसह कागदपत्रे कार्यालयास सादर करावी.

नविन वाहन खरेदीदारांना वाहन विक्रेत्यांकडूनच वाहन नोंदणी क्रमांक ऑनलाईन प्राप्त होणार असून नोंदणी प्रमाणपत्र कार्यालयातून पोष्टाव्दारे घरपोच पाठविण्यात येणार आहे. वाहन हस्तांतरण, वाहनांवर कर्जाची नोंद घेणे, वाहनावरील कर्जाची नोंद कमी करणे, दुय्यम प्रमाणपत्र जारी करणे, पत्ता बदलविण्यासाठी नोंद घेणे याकरीता ऑनलाईन अर्ज करुन विहित शुल्काचा भरणा करुन मुळ कागदपत्रे कार्यालयास सादर करावीत. यासोबतच परिवहन व परिवहनेत्तर वाहनाचा कर ऑनलाईन भरणा करता येणार आहे, असे उप प्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने कळविण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here