
वर्धा : कर्जाच्या हप्त्याची वसुली करून ती रक्कम बँकेत न जमा करता तब्बल १ लाख ५८ हजार ३५० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी पुलगाव पोलिसांत २१ फेब्रुवारी रोजी सोमवारी तक्रार दाखल करण्यात आली आहे. आनंद दिवेकर हा फायनान्स कंपनीने नागरिकांना दिलेल्या कर्ज रकमेची वसुली करण्याचे काम करायचा.
आनंद दिवेकर याने २४ ऑगस्ट २०१९ ते १३ ऑक्टोबर २०२१ या तीन वर्षांच्या कालावधीत परिसरातील कंपनीच्या तब्बल १३ कर्जधारकाकडून कर्जाच्या हप्त्याची वसुली करून तब्बल १ लाख ५८ हजार रुपयांची त्याने वसुली केली. मात्र, ती रक्कम बँक खात्यात जमा करता स्वत:च्या फायद्यासाठी वापरून अपहार केल्याचे उघडकीस आल्यानंतर याबाबतची तक्रार सतीश मधुकर जिंदे यांनी पुलगाव पोलिसांत दिली. तक्रारीनुसार पोलिसांनी आनंद दिवेकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.