स्वयंघोषित समाजसेवक सचिवाची मनमानी! कोट्यवधींची संपत्ती असलेल्या श्रीराम मंदिरावर उगवले झाड

गिरड : जिल्ह्यातील गिरड हे गाव पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून, येथील प्राचीन श्रीराम मंदिर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात असते. या मंदिराकडे कोट्यवधींची संपत्ती असतानाही मंदिराच्या देखभाल दुरुस्तीकडे आणि स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत असल्याने मंदिरावरच झाडे उगवली आहेत. यासंदर्भात अनेक तक्रारी व निवेदने दिली; परंतु स्वयंघोषित समाजसेवक म्हणून मिरविणाऱ्या सचिवाच्या मनमानी कारभारापुढे कुणाचेही चालत नाही.

प्राचीन श्रीराम मंदिराच्या कोट्यवधींच्या संपत्तीतून मंदिराचा व परिसराचा विकास करण्याऐवजी मंदिराची सत्ता आपल्या हाती राहावी यासाठी प्रयत्न चालविला जात आहे. मंदिरामध्ये कर्मचारी आहेत; पण नियमित साफसफाई होत नाही. येथे येणाऱ्या दर्शनार्थींकरिता पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. मंदिर परिसरात सर्वत्र अस्वच्छता आणि दुर्गंधी पसरलेली आहे. या मंदिराच्या बाजूला लाखो रुपये खर्च करून सिमेंटचा रस्ता बांधण्यात आला. त्या रस्त्यावरही या मंदिर व्यवस्थापनाने अस्वच्छता करून ठेवली आहे. मंदिरात असणाऱ्या गुरांची घाण आणि सांडपाण्यामुळे नागरिक आजारांचा सामना करीत आहेत.

परिसरातील नागरिकांनी मंदिर व्यवस्थापन आणि ग्रामपंचायत प्रशासनाला निवेदन दिले. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. यापूर्वी मंदिराच्या मालकीच्या शेतात ८० हजार रुपयांचा मुरूम घोटाळा सचिवांच्या सहकाऱ्याने केल्याच्या विरोधात जिल्हाधिकारी, धर्मादाय आयुक्त व पोलिसांत तक्रार करण्यात आली आहे. सचिवाविरुद्ध गुन्हा दाखल होताच त्यांनी पुन्हा दबावतंत्राचा वापर करायला सुरुवात केली. या देवस्थानातील सचिव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मनमानी कारभार चालविला असून, त्यांच्यावर कारवाई का होत नाही, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here