


वर्धा : जागतिक बेघर दिनानिमित्त नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी येथील आश्रित शहरी बेघर निवारा, वर्धा येथे भेट देत येथील आश्रयित वृद्ध, निराधार आणि बेघर नागरिकांची विचारपूस केली. या भेटीदरम्यान त्यांनी निवाऱ्यातील व्यवस्थापनाची पाहणी करत वृद्धांच्या दैनंदिन गरजा, आरोग्य आणि निवास व्यवस्थेबाबत सविस्तर माहिती घेतली.
वर्धा नगरपरिषदेच्या वतीने पं. दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान (NULM) अंतर्गत हा शहरी बेघर निवारा सुरू करण्यात आला आहे. या निवाऱ्याचे व्यवस्थापन आरंभ बहुउद्देशीय संस्था पाहते. या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवाऱ्यातील कार्यपद्धती, आश्रयितांची संख्या, त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सुविधा तसेच येणाऱ्या अडचणींबाबत माहिती दिली.
देशमुख यांनी संस्थेच्या कामाचे कौतुक करत, “बेघर नागरिकांना मानवी सन्मानाने जीवन जगता यावे, हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. या निवाऱ्याचे काम अधिक बळकट करण्यासाठी नगरपरिषदेच्या पातळीवरून शक्य ती सर्व मदत दिली जाईल, अशी ग्वाही दिली. यावेळी त्यांनी वृद्धांशीही संवाद साधत त्यांच्या आरोग्याची, जेवणाविषयीच्या व्यवस्थेची व दैनंदिन जीवनातील अडचणींची विचारपूस केली. वृद्धांनी आपुलकीने संवाद साधला भेटीदरम्यान आरंभ बहुउद्देशीय संस्थेच्या व्यवस्थापिका प्रतिभा बुटे, कर्मचारीवर्ग तसेच निवाऱ्यातील सर्व आश्रयित उपस्थित होते. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी नगरपरिषदेच्या सातत्यपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले.
















































