सेल्फीच्या नादात झुल्यावरुन खाली पडले युवक! तीन जण गंभीर जखमी; घोराड येथील घटना

सेलू : सेल्फीच्या नादात झुल्यावरुन अचानक खाली पडल्याने तीन जण गंभीर जखमी तर अनेकांना किरकोळ इजा झाल्याची घटना काल रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास घोराडच्या यात्रेत घडली. या दुर्घटनेत जखमी झालेल्यात चेतन राजू निमजे(वय१८) रा. घोराड, अंकीत संजय पराते(वय२२) रा. सेलू तसेच टाकळघाट येथील एका युवकाचा समावेश आहे.

याबाबत सविस्तर असे की, घोराड येथे सध्या यात्रा महोत्सव सुरू असून यात आकाशपाळणा, ड्रॅगन झुला व इतर मनोरंजनाच्या साहित्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. त्यामुळे साहजिकच परिसरातील तरुणाईसह बालगोपालांसाठी सदर यात्रा आकर्षणाचा विषय ठरली. परंतु काही हुल्लडबाजांमुळे सदर यात्रा महोत्सवाला काल अचानक गालबोट लागले. यात्रेतील ड्रॅगन झुल्यावर उभे राहून सेल्फी काढण्याच्या चक्करमध्ये चार जण अचानक खाली जमिनीवर कोसळले.

यावेळी यात्रेचा आनंद घेण्यासाठी खाली उभ्या असलेल्या गर्दीतील अनेकांच्या अंगावर ते पडल्याने स्वतःचे तर हातपाय मोडून घेतलेच शिवाय प्रेक्षकांनाही जखमी केले. यावेळी ड्रॅगनच्या अगदी टोकावर चार जण एकमेकांच्या खांद्यावर हात ठेवून सेल्फी काढत असतानाच त्यांचा तोल सुटला आणि चौघेही धाडकन जमिनीवर कोसळले. यातील काही उपस्थित लोकांच्यावर देखील पडलेत. या दुर्घटनेत घोराड येथीलच चेतन राजू निमजे ह्याच्या हाताची नस फाटली तसेच हड्डी देखील टचकली. त्याला आधी सेवाग्राम व नंतर नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

टाकळघाट येथील एका युवकाच्या पाठीच्या मणक्याला गंभीर इजा झाल्याने त्यालाही नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले. यावेळी गर्दीत उभ्या असलेल्या सेलूच्या अंकीत पराते ह्याच्या अंगावर ते युवक पडल्याने त्याच्या मांडीच्या हड्डीचे दोन तुकडे झाले. त्याच्यावर सेवाग्राम येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यासोबतच घोराड येथील एकास किरकोळ इजा झाल्याने त्याला उपचारानंतर सेवाग्राम रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. सदर दुर्घटनेत इतरही अनेकजण किरकोळ जखमी झाल्याचे कळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here