

वर्धा : केंद्र शासनाच्यावीने असंघटीत कामगारांसाठी प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन पेंशन योजना सुरु करण्यात आली आहे. वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील अंसघटीत कामगारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी रिक्षा चालक, फेरीवाले, घरगुती कामगार, दुकानवाले, पानटपरी, छोटे दुकानदार इत्यादी वय वर्ष 18 ते 40 वयोगटातील असंघटीत कामगार या योजनेस पात्र असणार आहे. योजनेंतर्गत लाभार्थ्यांना त्यांचे वयोगटानुसार मासिक 55 ते 200 रुपये दर महिन्याला प्रधानमंत्री श्रम योगी खात्यात जमा करावे लागणार आहे. तर तेवढीच रक्कम केंद्र शासनाच्यावतीने त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आशा योजनेंतर्गत जिल्हयातील ग्रामीण भागातील 1033 व शहरी भागातील 89 आशा स्वयंसेविका तसेच 52 आशा गटप्रवर्तक मोबदला तत्वावर काम करीत असून या सर्वांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी केले आहे. या योजनेकरीता ग्रामीण भागातील 504 आशा पात्र असून 502 आशा स्वयंसेविकांनी सदर योजनेचा विमा काढलेला आहे. तसेच शहरी भागामध्ये 82 आशा पात्र असून 79 आशा स्वयंसेविकांनी विमा काढलेला आहे. आशा गटप्रवर्तकामधून 38 गटप्रवर्तक पात्र असून 36 गटप्रवर्तकांनी विमा काढला असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. या प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
कामगारांनी आधारकार्ड, बचत जनधन खाते सर्व दस्ताऐवज आपले सेवा केंद्रामध्ये घेऊन जावे. अंगठा किंवा करंगळी व्दारे बॉयोमॅट्रीक मशीन नंतर मासिक उत्पन्न निश्चित करण्यात येईल. लाभार्थ्याला सुरवातीला नगदी पैसे भरावे लागणार आहे. लाभार्थ्याला संगणक प्रिंटरवर स्वाक्षरी करावी लागेल. सदर प्रक्रिया पुर्ण झाल्यावर लाभार्थ्याना श्रमयोगीचे पेंशन कार्ड मिळेल. दुस-या महिन्यापासुन त्यांचे स्वत:च्या बँक खात्यातून पैशाची कपात करण्यात येईल. या सर्व प्रक्रियेला 3 ते 5 मिनिटाचा अवधी लागतो, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राज पराडकर यांनी कळविले आहे.