
वर्धा : गायिका कवी सिंग यांच्या देशभक्तीपर गीतांनी स्वातंत्र्यदिनी वर्धकरांना अक्षरश: रिझविले. वीरांगणा ब्रिगेडच्या वतीने स्वातंत्र्य दिवसाचे औचित्य साधून शहरातून तिरंगा रॅली काढण्यात आली होती. देशभक्तीपर गीतांसाठी प्रसिद्ध असलेल्या गायिका कवी सिंग यांनी रॅलीदरम्यान देशभक्ती गीतांची मेजवानीच वर्धेकरांना दिली. रॅलीला युवक-युवतींचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.
वीरांगणा ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्ष अंबिका हिंगमिरे यांनी या तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे वर्धावासीयांना स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम साजरा करता आला नव्हता. या वेळीसुद्धा कोरोनाची भीती सर्वांच्या मनात कायम होती. कार्यकर्त्यांनी कोरोना नियमांचे पालन करून रॅलीत सहभाग घेतला होता.
गायिका कवी सिंग यांच्या गाण्यांना नागरिकांनी उत्स्फूर्त दाद दिली, अंबिका हिंगमिरे यांनी रॅलीदरम्यान नागरिकांशी हितगुज करून सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी माजी सभापती सलीम कुरेशी, राजीव शुक्ला, प्राजक्ता मुते, गजेंद्र डोळस, भूषण उईके, अंकिता पांडे, मोहन कराळे, सतराम आहुजा यांच्यासह वीसंगणा ब्रिगेडचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.