पॅसेंजर रेल्वे अद्यापही ‘लॉक’ का? प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर: सवारी गाड्या सुरू करण्याची मागणी

वर्धा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पॅसेंजर रेल्वे गाड्या बंद करण्यात आल्या. मात्र, आता सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून अनलॉक झाले असले तरी पॅसेंजर रेल्वे का बंद आहेत, याबाबतची विचारणा प्रवाशांकडून केली जात असून त्यांच्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र, याबाबत अजून कुठलाही निर्णय रेल्वे विभागाने घेतला नसल्याची माहिती रेल्वे विभागातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तब्बल आठ ते नऊ महिने रेल्वे वाहतूक ठप्प होती. त्यानंतर शिथिलता मिळाल्याने रेल्वे सेवा सुरू झाली. काही बोटांवर मोजण्याइतपत स्पेशल ट्रेन्स सुरू करण्यात आल्या. मात्र, आता कोरोना नियंत्रणात आला असला तरीदेखील पॅसेंजर रेल्वे सुरू न झाल्यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. त्यामुळे तत्काळ पॅसेंजर रेल्वे सुरू करण्याबाबत रेल्वे विभागाने दखल घ्यावी, अशी मागणी आता प्रवाशांकडून केली जात आहे. पॅसेंजर गाड्या सुरु न झाल्याने अनेक प्रवाशांमध्ये नाराजी पसरली आहे.

या पॅसेंजर रेल्वे अजूनही बंदच

वर्धा रेल्वे स्थानकावरुन नागपूर-अमरावती पॅसेंजर, अमरावती- नागपूर पॅसेंजर, वर्धा-भुसावळ, तर भुसावळ ते वर्धा अशा पॅसेंजर रेल्वेगाड्या सुरु होत्या. तर सेवाग्राम रेल्वेस्थानकावरुन काजीपेठ ते बल्लारशाह पॅसेंजर रेल्वे गाडी सुरु होती. मात्र, कोरोनामुळे यासर्व रेल्वेगाड्या अजूनही बंदच असल्याने प्रवाशांना आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.

सुरू असलेल्या स्पेशल ट्रेन्स

हसध्या वर्धा रेल्वेस्थानकाहून ३२ रेल्वेगाड्यांची धडधड सुरु आहे. यामध्ये प्रतिदिन धावणाऱ्या गाड्यांमध्ये मुंबई-गांदिया स्पेशल, अहमदाबाद-चेन्नई स्पेशल, मुंबई-हावडा स्पेशल, कोल्हापूर-गोंदिया स्पेशल, अहमदाबाद-हावडा स्पेशल, पुणे-हावडा स्पेशल, मुंबई-नागपूर स्पेशल या स्पेशल रेल्वे सध्या सुरु असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here