पत्नीच्या हाताला प्रियकराची साथ! धारदार शस्त्राने मारहाण करीत हत्या

आष्टी (शहीद) : पती-पत्नीत वारंवार खटके उडू लागले. अशातच पत्नीचे दीड वर्षांपूर्वी एका युवकाशी सूत जुळले. पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे पतीला माहिती झाले अन् दोघांत वाद सुरू झाला. आता पतीला संपवायचेच. असे मनात ठासून अखेर प्रियकर आणि त्याच्या मित्राच्या मदतीने पतीला धारदार शस्त्राने मारहाण करीत हत्या करून मृतदेह पोत्यात भरून घराच्या अवघ्या ५० मीटर अंतरावर असलेल्या शिक्षकाच्या घरासमोर नेऊन फेकला. ही घटना गुरुवारी मध्यरात्री १ ते १.३० वाजताच्या सुमारास घडली. शुक्रवारी पहाटे ५ वाजताच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आल्याने या हत्याकांडाने आष्टी शहर मात्र हादरून गेले. पोलिसांनी याप्रकरणी तिघांनाही अटक केल्याची माहिती दिली.

जगदीश भानुदास देशमुख (३८, रा. नवीन आष्टी) असे मृतकाचे नाव असून, पत्नी दीपाली देशमुख (३२), प्रियकर शुभम जाधव (२२), साथीदार विजय माने (२१) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. मृतक जगदीश देशमुख हा गवंडी कामगार होता. त्याचा विवाह दीपालीसोबत झाला होता. त्याला पाच वर्षांची मुलगी आणि तीन वर्षांचा मुलगा आहे. दोघांचाही संसार सुरळीत सुरू होता. पण, जगदीशला दारूचे व्यसन जडले होते, त्यामुळे जगदीश आणि दीपालीमध्ये वारंवार खटके उडत होते. याच कारणाने पत्नी दीपाली ही माहेरी निघून गेली होती. परत आली असता जगदीश आणि दीपाली हे दोघे वेगळे राहू लागले. पतीपासून त्रस्त दीपालीचे शुभम जाधव याच्याशी सूत जुळले.

याची माहिती जगदीशला झाल्याने त्याने पत्नी दीपालीशी वाद केला. अखेर मध्यरात्री पत्नी दीपाली, प्रियकर शुभम आणि त्याचा मित्र विजय यांनी मिळून जगदीशच्या डोक्यावर सेंट्रिंगच्या पाटीने जबर वार करीत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच धारदार शस्त्राने वार करीत जगदीशची हत्या करून मृतदेह पोत्यात भरून रस्त्याच्या कडेला फेकून दिला. घटनास्थळी श्वानपथक, ठसे तज्ज्ञांसह स्थानिक गुन्हे शाखेची चमू दाखल झाली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here