सेलू : शेतातील गोठ्याला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत १३ शेळ्यांचा होरपळून मृत्यू झाला. तसेच शेतीपयोगी साहित्यासह तेथे वास्तव्यास असलेल्या दोन कुटुंबियांचे संसारोपयोगी साहित्यही जळाल्याने त्यांच्यावर उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे. ही घटना सुकळी (स्टेशन) येथे गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली.
सुकळी (स्टेशन) येथील कोमल मारोतराव तडस यांचे गावालगतच शेत असून, तेथे गोठा आहे. या गोठ्यामध्ये शेतीसाठी आवश्यक असलेले साहित्य, जनावरे यासह दोन शेतमजुरांच्या कुटुंबांचे वास्तव्यही तेथेच आहे. गुरुवारी सकाळी गोठ्याला अचानक आग लागली. काही क्षणातच आगीने गोठ्याला कवेत घेतले. या आगीमध्ये शेतमजूर मारोती वरठी यांच्या मालकीच्या १९ शेळ्यांपैकी १३ शेळ्यांचा अक्षरश: कोळसा झाला. इतर जनावरांना वाचविण्यात यश आले. वरठी व येडमे या दोन्ही मजुरांच्या परिवाराचे अन्नधान्य, टीव्ही, कुलर, कपाटासह सर्व संसारोपयोगी साहित्याची राखरांगोळी झाली. शेतमालक कोमल तडस यांच्या मालकीचे शेतीपयोगी साहित्य आणि ३० बॅग सिमॅट जळाले. घटनेची माहिती तलाठी व महावितरणच्या कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड व उपनिरीक्षक कंगाले यांनी घटनास्थळी पाहणी केली. पोलीस कर्मचारी नारायण वरठी यांनी पंचनामा केला.