

वर्धा : कोरोनाच्या महामारीत अनेकांचे रोजगार गेल्याने आधीच अनेकांची आर्थिक कोंडी झाली आहे. ही कोंडी फोडण्यासाठी धडपड सुरु असतानाच पेट्रोल-डिझलच्या दरवाढीचा सपाटा सुरुच आहे. परिणामी महागाईचा भटका उडाल्याने अनेकांना महिन्याचा खर्च भागविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे.
या वर्षात सुरुवातीपासूनच पेट्रोल-डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. पेट्रोल शंभरापार गेले असून डिझेलही शंभर रुपयांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहतुकीचा खर्च वाढल्याने इतरही वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाली आहे. सिलिंडरच्या दरामध्येही नुकताच २५ रुपयांनी वाढ झाल्याने गृहिणींचे बजेट कोलमडले आहे. अनेकांसाठी सिलिंडर विकत घेणे आवाक्याबाहेर गेल्याने चुली फुंकायला सुरुवात झाली आहे.
मार्च २०२० पासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लोकडाऊनमुळे अनेकांचे कंबरडे मोडले असताना आता महागाई जखमेवर मीठ चोळणारी ठरत आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे किराणा, भाजीपाला, कापड यासह इतरही जीवनावश्यक वस्तुंच्या किंमतीमध्ये वाढ झाल्याने सर्वसामान्यांना झळ सोसावी लागत आहे. आता या किंमती कमी होण्याची काहीच चिन्हे दिसत नसल्याने या महागाईचाच नागरिकांना सामना करावा लागणार आहे.