जिल्ह्यातील ऑक्सिजन प्लांट तातडीने कार्यान्वित करा! जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश; 5 ऑक्सिजन प्लांटची उभारणी पुर्ण

वर्धा : राज्यात कोरोनासह ओमायक्रॅानचे रुग्ण वाढत आहे. जिल्ह्यातही रुग्ण वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यात सुरु करण्यात आलेले ऑक्सिजन प्लांट तातडीने कार्यान्वित करावे. ऑक्सिजन व्यवस्थापन आराखडा तयार ठेवावा. कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कातील लोकांचा पाठपुरावा वाढवा, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले.

कोरोनाच्या संभाव्य परिस्थितीचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा.सचिन ओम्बासे, पोलिस अधीक्षक प्रशांत होळकर, अपर पोलिस अधीक्षक यशवंत सोळंके, जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सचिन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॅा.प्रवीण वेदपाठक, जिल्हा नियोजन अधिकारी राजीव कळमकर, बांधकामचे कार्यकारी अधिकारी प्रकाश बुब, जिल्हा प्रशासन अधिकारी मनोजकुमार शहा आदी उपस्थित होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनचा तुडवडा जाणवल्याने राज्यात मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजन प्लांट उभारण्याचे काम हाती घेण्यात आले. जिल्ह्यातही पाच प्लांट उभारण्यात आले आहे. या पाचही प्लांटमधून 2 हजार 700 लिटर प्रती मिनीट इतके ऑक्सिजन निर्माण होणार आहे. यातील दोन प्लांट वर्धा येथे असून या प्लांटची क्षमता 1 हजार 500 लिटर प्रती मिनीट इतकी आहे. कारंजा व हिंगणघाट येथे प्रत्येकी 500 लिटर प्रती मिनीट क्षमतेचा प्रत्येकी एक तर आर्वी येथे 200 लिटर प्रती मिनीट क्षमतेचा एक प्लांट उभारण्यात आला आहे. या प्लांटमधून नव्याने 350 ऑक्सिजन बेड तयार होत आहेत.

कोरोनाचा संभाव्य धोका पाहता हे सर्व प्लांट तातडीने कार्यान्वित करण्याचे निर्देश बैठकीत जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिले. रुग्णालयांमध्ये कार्यरत ऑक्सिजन व्यवस्थेचे नियोजन करण्यात यावे. त्यासाठी नियोजन आराखडा तयार करण्याच्या सुचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. नव्याने आढळून आलेल्या कोरोना रुग्णांच्या निकट संपर्कातील व्यक्तींचा पाठपुरावा करून त्यांची चाचणी केली जावी. कोरोनाचे रुग्ण वाढल्यास मोठ्या प्रमाणावर औषधांची गरज भासतील, त्यासाठी आतापासूनच तयारी करुन ठेवण्यात यावी, अशा सुचना आरोग्य विभागास केल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here