आर्वी तहसीलच्या निबंधक कार्यालयाला भीषण आग! रेकॉर्ड जळून खाक; जिवाची पर्वा न करता आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न

आर्वी : येथील शहराच्या मध्यवर्ती असलेल्या तहसील कार्यालयाला रात्री अडीचच्या दरम्यान अचानक आग लागली. तहसील कार्यालयातील दुय्यम निबंधक व नायब तहसीलदार यांचा रेकॉर्ड जळून खाक झाला. परंतू आग आटोक्यात आणण्यासाठी केलेल्या शर्थीच्या प्रयत्नाने निराधार योजनेतील काही रेकॉर्ड वाचविण्यात यश मिळाले. परंतु जवळपास ५० लाभार्थींचे दस्तऐवज जळून खाक झाले.

तहसील कार्यालयाच्या लगत असलेल्या पोलीस ठाण्यात ड्युटीवर असलेल्यांना आगीमुळे निघत असलेला धुर निदर्शनास आला असता त्यांना ट्रेझरी कार्यालयातून धुर दिसून आल्याने जवळ जाऊन पाहणी केली. लागलेल्या आगीचे स्वरूप लक्षात घेता त्यांनी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक यांना माहिती दिली.

माहिती मिळताच लगेच नगर परिषद येथे फोन करून घटनास्थळी अग्निशामक दलाची गाडी बोलावून आग विझविण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु आग आटोक्यात येत नसल्याने आष्टी व पुलगाव येथून अग्निशामक दलाची गाडी बोलावण्यात आली. घटनास्थळी उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार विद्यासागर चव्हाण, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, उपमुख्य अधिकारी रणजित पवार अभियंता साकेत राऊत पोहचले.

पोलीस स्टेशन कर्मचारी नगरपालिकेचे कर्मचारी महसूल कर्मचारी व आर्वी तील सर्व सामाजिक कार्यकर्ते यांनी जिवाची पर्वा न करता लागलेली आग आटोक्यात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले. बहुतांश रेकॉर्ड आगीमध्ये जळून खाक झाल्याचे दिसून आले तर काही कोतवाली रेकॉर्ड वाचवण्यात यश मिळाले. आगीत वाचलेला रेकॉर्ड लागून असलेल्या पटवारी ऑफिसमध्ये हलवण्यात आला. घटनास्थळी आमदार दादाराव केचे यांनी पाहनी केली. आपात्कालीन परीस्थितीत शासकीय यंत्रणेच्या केलेल्या प्रयत्नांनी आग आटोक्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here