

पवनार : २५ एप्रिल जागतिक हिवताप दिनाचे औचित्य साधून हिवताप जनजागृती सप्ताह साजरा करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आयुष्मान आरोग्य मंदिर (उपकेंद्र), पवनार येथे आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि विद्यार्थ्यांच्या सहभागातून व्यापक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले. समुदाय आरोग्य अधिकारी अक्षय इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषदेच्या मुलींच्या शाळेत विद्यार्थ्यांना हिवताप, डेंग्यू, चिकनगुनिया यांसारख्या किटकजन्य तसेच जलजन्य आजारांबाबत माहिती देण्यात आली. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन परिसरात रॅली काढली आणि “स्वच्छता हाच बचावाचा उपाय”, “पाण्याची साचलेली ठिकाणे टाळा” अशा घोषणांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली.
कार्यक्रमामध्ये हिवताप प्रतिबंधक उपाय, प्राथमिक उपचार आणि स्वच्छतेचे महत्त्व यावर भर देत आरोग्य शिक्षण देण्यात आले. यामध्ये आनंद पिलारे, दर्शना सरोदे, संगीता वाटमोडे, अर्चना घुगरे, गीता घुगरे, अर्चना वंजारी, संगीता ढोले, अश्विनी कांबळी, ज्योती माजरे (सर्व आशा) यांचा मोलाचा सहभाग होता. कार्यक्रमाच्या माध्यमातून गावकऱ्यांमध्ये संसर्गजन्य आजारांविषयी सजगता वाढविण्यास यश मिळाले असून, आरोग्य विभागाचे हे प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहेत.