सरपंचांसह तीन गावातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन! आमदारांसमोर महावितरण कर्मचाऱ्यांच्या कारभाराचा वाचला पाढा; उपविभागीय अभियंत्यांनी केले आश्वस्त

केळझर : येथील वीज वितरण कार्यालयाचे कनिष्ठ अभियंता व लाईनमन यांच्या मनमानी कारभाराला कंटाळलेल्या केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) या तीन गावांतील ग्रामस्थांसह सरपंचांनी बुधवारी ठिय्या आंदोलन केले. वीज वितरण कार्यालयासमोर सुरू असलेल्या या आंदोलनाची माहिती मिळताच आमदार डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलनस्थळी जाऊन सरपंचांकडून समस्या जाणून घेतल्या. त्यानंतर उपविभागीय अभियंत्यांना बोलावून त्यांच्याकडून आश्वस्त केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

थोडे जरी वादळ व पाऊस झाला की केळझरसह लगतच्या पाच ते सहा गावांतील विद्युत पुरवठा खंडित करतात. बऱ्याच वेळाने तो सुरू केला जातो. वीज वितरणचे कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रात्री काही बिघाड झाल्यास लाईनमनला संपर्क साधला, तर प्रतिसाद मिळत नाही. शेतातील वीज पुरवठ्यात बिघाड झाल्यास तो महिनाभर दुरुस्त होत नाही. त्यामुळे सिंचनाच्या मोठ्या अडचणी निर्माण होतात. वर्षभरापूर्वी नवीन वीज जोडणीकरिता डिमांडची रक्कम भरूनही अद्याप जोडणी मिळाली नाही. गावातील पथदिव्यांमध्ये बिघाड आल्यास ‘हे आमचे काम नाही’ असे लाईनमन सांगतो. कार्यालयात गेल्यावर कनिष्ठ अभियंता जीवतोडे व लाईनमन मानकर उडवा-उडवीची उत्तरे देतात, आदीमुळे केळझर, आमगाव (खडकी) व नवरगाव (पुनर्वसन) येथील सरपंचांनी ग्रामस्थांसह वीज वितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू केले. याची माहिती मिळताच आ. डॉ. पंकज भोयर यांनी आंदोलकांची भेट घेऊन समस्या जाणून घेतली.

कार्यालयात कर्मचारीच उपस्थित नसल्याने सेलूचे उपविभागीय अभियंता मनोज खोडे यांना बोलावण्यात आले. त्यांच्या उपस्थितीतच ग्रामस्थांनी तक्रारींचा पाढा वाचला. आमगाव (खडकी) तील इंदिरानगर व नवरगाव (पुनर्वसन) येथील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीवरील वीज जोडणी गावठाणच्या फिडरवर नसल्याने या गावात नियमित पाणीपुरवठा करताना अडचणी येतात. गेल्या वीस दिवसांपासून पाणीपुरवठा झाला नसल्याचे वारंवार ग्रामस्थांनी कळविले. गावठाण फिडरवर जोडणी करण्याची मागणीही केली पण, दखल घेतली नाही. त्यामुळे कनिष्ठ अभियंता व लाईनमनची बदली करण्याची मागणी रेटून धरली. अखेर उपविभागीय अभियंता खोडे यांनी समस्या सोडविण्याचे आश्वासन दिल्याने रोष निवळला. यावेळी केळझरच्या सरपंच अर्चना लोणकर, उपसरपंच सुनील धुमोने,आमगावच्या सरपंच नंदा मंगाम, नवरगावचे सरपंच संजय गजांम, जि. प. सदस्य विनोद लाखे, भाजपचे तालुका उपाध्यक्ष विजय खोडे, फारुख शेख, कृष्णा वाकडे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here