ट्रकद्वारे होत होती वाहतूक! १५.६०० किलो गांजा जप्त; आरोपीकडून ८.६१ लाखांचा मुद्देमाल केला जप्त

वडनेर : पांढरकवडा येथून नागपूरच्या दिशेने जात असलेल्या ट्रकद्वारे गांजाची तस्करी केली जात असल्याची माहिती मिळताच अलर्ट मोडवर आलेल्या वडनेर पोलिसांनी थेट अक्शन करीत तब्बल १५ किलो ६०० ग्रॅम गांजा जप्त केला आहे. या धडक कारवाईमुळे छुप्या पद्धतीने गांजाची वाहतूक करणाऱ्यांमध्ये धडकीच भरली आहे. ही कारवाई शनिवारी रात्री उशिरा दारोडा टोल नाका परिसरात करण्यात आली.

गोपनीय माहिती मिळाल्यानंतर वडनेर पोलिसांनी नागपूर-हैदराबाद मार्गावरील दारोडा शिवारात नाकेबंदी करून काही वाहनांची तपासणी केली. एम, एच. ४० ए. के. ६६९७ क्रमांकाच्या ट्रकला अडवून वाहनासह वाहनचालकाची झडती घेतली असता वाहनात मोठ्या प्रमाणात गांजा आढळून आला. पोलिसांनी वाहनचालक अनिलकुमार श्रीजयकरण यादव (२१) रा. मध्यप्रदेश याला ताब्यात घेत ट्रकमधील दीड लाख रुपये किमतीचा १५ किलो ६०० ग्रॅम गांजा, गांजाची वाहतूक करण्यासाठी वापरण्यात आलेला सात लाख किमतीचा एम. एच. ४० ए. के, ६६९७ क्रमांकाचा ट्रक, महागडा मोबाईल असा एकूण ८ लाख ६१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

या प्रकरणी वडनेर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद घेत आरोपीस अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कदम यांच्या मार्गदर्शनात वडनेरचे ठाणेदार कांचन पांडे, पोलीस उपनिरीक्षक राजू सोनपितरे, मारोती जांभळे, प्रशांत मेश्राम, राहुल फल्हाने, सचिन सुरकार, अमित सोनुले, भूषण जोगे आदींनी केली. पुढील तपास सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here