

पुलगाव : मुसळधार पावसामुळे नाल्याच्या पाण्यात कमालीची वाढ झाली. ओसंडून वाहणाऱ्या नालाचे दृश्य बघण्यासाठी गेलेली दोघे बालके तोल जाऊन नाल्याच्या पाण्यात पडली. यातच त्यांचा दुर्दैवी अंत झाला. ही घटना पुलगाव येथील बरांडा परिसरात घडली. पुलगाव शहरात एकच खळवळ उडाली होती. प्रणय जगताप (१४) व आदित्य शिंदे (१५) अशी मृत बालकांची नावे आहेत.
शनिवारी जिल्ह्यासह पुलगाव परिसरात मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पुलगाव शहरातील बरांडा भागातील नाला ओसंडून वाहत होता. हे दृश्य बघण्यासाठी प्रणय जगताप व आदित्य शिंदे हे दोघे गेले असता अचानक ते नाल्याच्या प्रवाहात पडले. शिवाय वाहून गेले. ही बाब लक्षात येताच पोलिसांना माहिती देत नागरिकांकडून शोध व बचाव मोहीम राबविण्यात आली. याच शोधमोहिमे दरम्यान सुरुवातीला प्रणय जगताप याचा, तर नंतर आदित्य शिंदे याचा मृतदेह सापडला. या घटनेची नोंद पुलगाव पोलिसांनी घेतली आहे. या घटनेमुळे शिंदे व जगताप कुटुंबीयांवर दु:खाचा डोगर कोसळला आहे.