बांधकाम कामगार योजना मंडळासाठीच ‘कल्याणकारी’! कंत्राटदारांचं चांगभलं : आधी वाटल्या पेट्या; आता वाटणार आहेत ताटवाट्या

वर्धा : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाकडून नोंदणीकृत कामगारांना वर्षभरापूर्वी सुरक्षा किट असलेल्या लोखंडी पेट्यांचे वितरण करण्यात आले. त्यानंतर आता ताटवाट्यांसह गृहोपयोगी वस्तूंचा संच वितरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वितरित केलेल्या पेट्यांची बाजारातील किंमत आणि मंडळाकडून कंत्राटदाराला दिलेल्या देयकातील किंमत यात मोठी तफावत दिसून आली आहे. हाच प्रकार आता गृहोपयोगी वस्तूंच्या वाटपातही होण्याची शक्यता असून, या योजना कामगारांपेक्षा मंडळ आणि कंत्राटदारांसाठीच ‘कल्याणकारी’ ठरत असल्याची ओरड होत आहे.

गेल्या वर्षी राज्यभरात जवळपास २३ लाख कामगारांना तालुकास्थळी शिबीर लावून पेट्यांचे वितरण करण्यात आले. या पेटीतील साहित्याची बाजारातील किंमत चार ते पाच हजार रुपये आहे. परंतु, कंत्राटदाराला प्रतिपेटी १४ हजार रुपयांप्रमाणे देयक अदा केल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे. ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेचेही खासगी कंपनीला कंत्राट दिले आहे. राज्यभरात केवळ १० लाख कामगारांचेच नूतनीकरण झाले. नूतनीकरण केल्यानंतर मिळणाऱ्या ओळखपत्राची बाजारातील किंमत पंधरा रुपये असताना त्यासाठी २५ रुपये दिले जात आहेत. आता गृहोपयोगी वस्तूंचा संच देण्याचे कंत्राट पेटी पुरवठा करणाऱ्या कंत्राटदारालाच दिले जाण्याची शक्यता आहे. नागपूरस्थित या कंत्राटदाराचे मंत्रालयापर्यंत कनेक्शन असल्याचे सांगण्यात येते.

गृहोपयोगी वस्तू संचात काय मिळणार?
गृहोपयोगी वस्तू संचात चार ताटे, आठ वाट्या, पाण्याचे चार ग्लास, तीन पातेली झाकणासह, दोन मोठे चमचे, एक पाण्याचा जग, सात भाग असलेला एक मसाला डबा, झाकणांसह तीन डबे, एक परात, कुकर, कढई आणि स्टीलची टाकी झाकणासह या वस्तुंचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here