

वर्धा : सेलू तालुक्यातील केळझर येथील साई लॉन परिसरात 30 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आला. ही घटना गुरुवारी १८ रोजी सकाळी ७:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली. सागर मुकेश जैन (30 रा. केळझर) असे मृत युवकाचे नाव आहे. या प्रकरणी सेलू पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद घेण्यात आली आहे.
माहितीनुसार सागर हा राजस्थान येथील असल्याचे सांगण्यात आले आहे. त्याच्या वडिलांचे केळझर येथे मिठाईचे दुकान आहे. तो बुधवारी सायंकाळी रामजन्मोत्सवानिमित्त गावातून निघालेल्या शोभायात्रेत सहभागी होण्यासाठी गेला होता. मात्र रात्र होऊनही तो घरी परतलाच नाही. गुरुवारी सकाळी फिरण्यासाठी गेलेल्या नागरिकांना साई लॉन परिसरात युवक मृतावस्थेत आढळून आला. ही माहिती गावात पसरताच घटनास्थळी पाहण्यासाठी लोकांनी गर्दी केली. पोलिस पाटील प्रकाश खंडाळे यांनी सेलू पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिस उपनिरीक्ष प्रवीण भोयर यांनी घटनास्थळी जात पंचनामा केला. सागरचा मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला. मृत्यू नेमका कसा झाला, हे अद्याप कळू शकले नाही. भाऊ विरल मुकेश जैन (२४) यांन दिलेल्या तक्रारी वरुन सेलू पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली. पुढील तपास पोलिस निरीक्षक तिरुपती राणे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक भोयर करीत आहे.