सोयाबीन पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी; डॉ. प्रशांत उंबरकर

वर्धा : सोयाबीन पिकावर प्रामुख्याने खोडमाशी, फुलकिडे, पांढरी माशी, मावा या किडींचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे मागील काही वर्षापासून निदर्शनास येत आहे. रस शोषण करणाऱ्या किडींमुळे विषानुजन्य रोगांचा प्रसार होत असतो. बुरशीजन्य रोग मुळकुज व खोडकुज या रोगांचा प्रादुर्भाव सुरुवातीला रोपावस्थेत ज्यास्त पाऊस आणि शेतात पाणी साचल्यामुळे होतो. या कीड आणि रोगांचे व्यवस्थापन करण्याकरिता बीजप्रक्रिया अत्यंत महत्वाची ठरू शकते.

पिकावरील मर, मुळकुज अशा जमिनीत वास्तव्य असणाऱ्या रोगकारक बुरशीमुळे होणाऱ्या रोगाचे नियंत्रण बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करून करता येते. रस शोषक किडी आणि खोडमाशी या किडींपासून किटकनाशकाची बीजप्रक्रिया केल्याने पिक किमान एक महिन्यापर्यंत सुरक्षित राहते. जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया केल्यामुळे उत्पादनात वाढ होऊन जमिनीची सुपीकता वाढते. बीजप्रक्रिया करतांना प्रथम रासायनिक बुरशीनाशक कार्बोक्झीन ( ३७.५ % ) अधिक थायरम ( ३७.५ % ) ( संयुक्त बुरशीनाशक ) ३ ग्राम प्रति किलो बियाणे आणि नंतर किटकनाशक थायोमिथोझाम ( ३० % एफ.एस. ) १० मिली प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करून घ्यावी.

पेरणीपूर्वी सोईनुसार १ ते २ दिवस अगोदर ही प्रक्रिया करावी. त्यानंतर पेरणीच्या दिवशी पेरणीच्या दोन तास आधी जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा व्हिरिडी ४ ग्राम प्रति किलो बियाणे आणि जिवाणू संवर्धक रायझोबियम जापोनिकम २५ ग्राम अधिक पि.एस.बी. २० ग्राम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. असे आवाहन डॉ. प्रशांत उंबरकर शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्र, वर्धा यांनी केले आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here