लोहा-सिमेंटच्या दरात वाढ! जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्राला बसला ३० टक्क्यांचा फटका; पेट्रोल-डिझेल दरवाढीचा परिणाम

वर्धा : आपलेही चांगले आणि मजबूत घर असावे, अशी इच्छा प्रत्येक व्यक्ती बाळगतो. त्यामुळेच शासकीय स्तरावर घरकुल योजनेच्या माध्यमातून समाजातील दुर्बल घटकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही होत आहे. परंतु, मागील काही दिवसांपासून पेट्रोल व डिझेलच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत आहे. याच दरवाढीचा परिणाम लोहा-सिमेंटच्या दरावर झाला असून, जिल्ह्यातील बांधकाम क्षेत्रावर याचा तब्बल ३० टक्क्यांनी परिणाम झाल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येते.

पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्चात वाढ झाली. यामुळेच लोखंडाचे तसेच विविध बांधकाम साहित्यांच्या दरात वाढ झाल्याने घराचे स्वप्न महागले आहे. डिझेल आणि कोळशाच्या भाववाढीचा हा परिणाम असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोल व डिझेलचे दर सध्या आकाशालाच भिडले आहेत. पेट्रोल ११३.७९ तर डिझेल १०३.१२ रुपये प्रतिलीटरच्या घरात आहे. पूर्वी विटांचा दर प्रतिहजार चार हजारांच्या घरात होता तो आता प्रतिहजार सहा हजारांवर पोहोचला आहे. घर बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडाच्या दरातही मोठी तेजी आली आहे.

सिमेंट ८० रूपयांनी महागले

सिमेंट तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या कच्च्या मालाच्या दरावर डिझेल दरवाढीचा परिणाम झाला. विविध कच्च्या मालांच्या दरात वाढ झाल्याने उत्पादन खर्च वाढला. शिवाय सिमेंटच्या वाहतूक खर्चातही वाढ झाली आहे. सप्टेंबर महिन्यात सिमेंटची बॅग ३०० ते ३३० रुपयांच्या घरात होती, ती आता ३९० ते ४१० रुपये झाली आहे.

लोखंडही महागले

घर बांधकामासाठी मोठ्या प्रमाणात लोखंडाचा वापर केला जातो. पण पेट्रोल-डिझेल दरवाढीचा यावरही परिणाम झाला असून, ४ ऑक्टोबरपर्यंत ५१ रुपये किलो दर असलेले लोखंड आता ६३ रुपये प्रति किलोवर पोहोचले आहे. डिझेल व कोळशाचे वाढलेले दर आदींमुळे बांधकामासाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडाचे भाव वाढल्याचे सांगण्यात येते.

काचेचे दरही वधारले

कोळशाचे खासगीकरण होताच याचे भाव चांगलेच वाढले. पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीमुळे वाहतूक खर्च ३० टक्क्यांनी वाढला आहे. सध्याच्या विज्ञान युगात काचेचा वापर सर्वच क्षेत्रात कमी-अधिक प्रमाणात होत असून, घर आकर्षक दिसावे म्हणून काचेचा वापर केला जातो. पण पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे काचेचेही दर वधारले आहेत.

फ्लॅटच्या दरात झाली वाढ

डिझेलच्या दरवाढीचा विविध क्षेत्रांना चांगलाच फटका बसला आहे. बांधकाम क्षेत्रही यापासून सुटले नसून, घर बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दरात वाढ झाली असून, घर बांधकाम महागले आहे. अशातच फ्लॅटच्या दरातही बऱ्यापैकी वाढ झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here