क्यूआर कोडवर आता आधारकार्ड तक्रारींचे निराकरण! तक्रारींसाठी आधारकार्डधारकांची पायपीट थांबली; जिल्ह्याचा उपक्रम अन्य ठिकाणीही राबविणार

वर्धा : नागरिकांना आधारकार्ड संबंधी असलेल्या तक्रारीसाठी जिल्हास्तर किंवा आधार प्राधिकरणाच्या मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागते. जिल्हा प्रशासनाने मात्र नागरिकांच्या या समस्या क्षणात निकाली काढण्यासाठी क्यूआर कोडचा अभिनव उपक्रम सुरु केला आहे. कोड स्कॅन केल्यानंतर दिसणा-या अर्जात आवश्यक माहिती भरल्यानंतर तक्रार दाखल होऊन कालमर्यादेत ती निकाली काढल्या जाते.

विविध शासकीय लाभ, शैक्षणिक सुविधा, बँक व्यवहार व ओळखपत्र म्हणुन आधारकार्ड अत्यंत महत्वाचे आहे. या कार्डसंबंधात नागरिकांना अनेक प्रकारच्या तक्रारी असतात. त्यासाठी स्थानिक स्तरावर तक्रार निवारणाची सोय नसल्याने नागरिकांना जिल्हास्तरावरील आधारकक्ष किंवा मुंबई येथील प्रादेशिक कार्यालयात प्रत्यक्ष तक्रार दाखल करावी लागते. यात नागरिकांचा वेळ आणि पैश्याचा अपव्यय होतो. यावर स्थानिकस्तरावरच कार्यवाही होण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांच्या नेतृत्वात जिल्हा आधार कक्षाने एक विशिष्ट कोड तयार केला आहे. हा कोड स्कॅन केल्यानंतर एक अर्ज मोबाईल किंवा संगणकावर उघडल्या जातो. यात तारीख, जिल्हा, पत्ता, संपर्क क्रमांक व आधार संबंधी असलेली तक्रार नोंद केल्यानंतर आपोआप तक्रार अर्ज जिल्हा आधार कक्षाला सादर होतो. या कक्षातून त्यावर कालमर्यादेत कार्यवाही केली जाते.

जिल्हा कक्षाकडून तक्रारीचे निराकरण होणे शक्य नसल्यास सदर अर्ज मुबंई येथील प्रादेशिक कार्यालयास वर्ग केला जातो. व तक्रारीचे निराकरण केले जाते. तक्रार निवारणासाठी या सुविधेमुळे नागरिकांना कुठेही जाण्याची आवश्यकता नाही. आधारकार्डमध्ये जन्मतारखेत बदल, नावात बदल, किंवा आधारकार्ड डाऊनलोड न होणे, आधारलिंकींग मधील अडचणी अशा प्रकारच्या आधारकार्ड धारकांच्या तक्रारी असतात. या तक्रारी आता ते केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करुन सोडवू शकतात. दाखल तक्रारीपैकी 40 टक्के तक्रारींचे निराकरण जिल्हास्तरावरच होतात. इतर तक्रारी मुंबई येथील टीम कडून निकाली काढल्या जाते. अशा प्रकारचा आधारकार्ड धारकांना दिलासा देणारा हा राज्यातला पहिलाच उपक्रम आहे.
आधारकार्ड तक्रारदारांकडे क्यूआर कोड स्कॅन करण्यासाठी ॲन्ड्रॉईड मोबाईल उपलब्ध नसल्यास गावस्तरावरील आधार केंद्रावर देखील क्यूआर कोडची सुविधा उपलब्ध आहे. या उपक्रमाची आधारकार्ड प्राधिकरणाकडून दखल घेण्यात आली असून लेखी पत्रान्वये यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांची आधारच्या महाराष्ट्र व गोवा प्रमाणिकरण संचालकांनी कौतुक केले आहे. हा नाविण्यपूर्ण उपक्रम अन्यठिकाणी देखील राबविण्याचा माणस आधार प्राधिकरणाने व्यक्त केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here