द्राक्षांचा ट्रक दुचाकीला धडकला! दुचाकीचालक गंभीर जखमी

वर्धा : द्राक्षे घेऊन जाणाऱ्या ट्रकचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रकचालकाने दुचाकीला जबर धडक दिल्यामुळे दुचाकीचालक युवक गंभीर जखमी झाला. तर ट्रक रस्त्याच्या बाजूला जाऊन पलटी झाला. हा अपघात शनिवारी सकाळी ८ वाजता नागपूर महामार्गावरील केळझरजवळ झाला.

तुळजापूर येथून ट्रक (क्र. एमएच-४०. सीटी- ०६८३) द्राक्षे घेऊन नागपूरकडे जात होता. या भरधाव ट्रकचे मागचे टायर अचानक फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटल्याने समोरच्या दुचाकीला (क्र. एमएच- 3२. एव्ही-५७२६) धडक देऊन पलटी झाला. या धडकेत दुचाकी चालक सर्वेश वसंत कडू (२५) हा गंभीर जखमी झाला. सर्वेश हा खडकी येथे दर्शनाकरिता जात होता. अपघाताची माहिती कळताच फिरोज शेख, मुन्ना पारधी, वृषभ कडू आदी तरुणांनी जखमीला सेवाग्राम रुग्णालयात हलविले. अपघातानंतर द्राक्षांचे कॅरेट अस्ताव्यस्त पडले होते. काही नागरिकांनी याचा फायदा घेत द्राक्षे लांबविल्याचे सांगण्यात आले. सेलू ‘पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा करीत वाहतूक सुरळीत केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here