नापिकीमुळे वृद्ध शेतकऱ्याची आत्महत्या! विहिरीत घेतली उडी

साहूर : घरात अठरा विश्व दारिद्र्य, सततची नापिकी आणि यावर्षी अतिवृष्टीने पुन्हा त्यात भर घातल्याने हताश होऊन साहूर येथील अल्पभूधारक शेतकरी मधुकर टीकाराम गणेसर (85) यांनी घरालगतच्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना 27 ऑक्टोबरला मध्यरात्रीच्या सुमारास घडली

येथील अल्पभूधारक शेतकरी मधुकर टीकाराम गणेसर यांच्याकडे चार एकर कोरडवाहू शेती आहे. पत्नी, दोन मुले, दोन स्नुषा व नातवंड असा त्यांचा परिवार आहे. मधुकर गणेसर यांचे अगदी लहानपणापासून उभे आयुष्य कष्टात गेले. लहानपणापासूनच त्यांची कष्ट उपसण्याची तयारी होती. त्यांनी परिवारासाठी कष्ट उपसले, पण शेतीतील उत्पन्न दगा देत होते. आयुष्य कष्टात जाऊनही दारिद्र्य पिच्छा सोडत नव्हते आणि यावर्षीच्या अतिवृष्टीने तर त्यात आणखीनच भर घातली होती. त्यामुळे नापिकीचा फास मधुकर गणेसर यांच्या गळ्याभोवती आणखीनच घट्टपणे आवळला गेला.

काही खाजगी उधारीची परतफेड कशी करायची तसेच कुटुंबाचा दैनंदिन खर्च कसा चालवावा, याचीही त्यांना चिंता होती. यातून काही मार्ग दिसत नसल्याने मधुकर गणेसर यांनी हताश होऊन विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. 27 ऑक्टोबर रोजी रात्री 12 वाजतानंतर सगळे झोपले असताना ते कुणाला न सांगता घराबाहेर पडले. त्यांनी घराजवळ असलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ते घरी नसल्याची बाब रात्री दोन वाजता घरच्यांच्या लक्षात येतात त्यांनी शोधाशोध केली असता त्यांची काडी आणि चप्पल विहिरीजवळ पडून असल्याने त्यांनी विहिरीत आत्महत्या केली असल्याचे लक्षात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here