

सेलू : रिधोरा येथील पंचधारा जलाशयाच्या घोगऱ्या डोहात पाण्यात डुबून दोन युवकांचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी 28 ऑक्टोंबर रोजी सायंकाळी 5 वाजताचे सुमारास उघडकीस आली. सौरभ मनोहर भावरकर (30) रा. पंजाब कॉलनी, वर्धा व विकास रामदास नवघरे (34) रा. शिक्षक कॉलनी सेवाग्राम, अशी मृत पावलेल्या युवकांची नावे आहेत याच ठिकाणी दोन दिवसांपूर्वी म्हणजे बुधवारी एका युवकाचा मृत्यू झाल्याची बाब ताजी असताना परत ही घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
मृतक दोन तरुण व सचिन रामचंद्र देशमुख आणि हर्षळ प्रकाश ताल्हन असे चार जण रिंधोरा येथील पंचधारा धरणावर फिरायला गेले होते. यातच ते धरणामागील घोगऱ्या डोहावर गेले असता त्यांना पोहण्याचा मोह झाला. पोहण्यासाठी चौघांनीही पाण्यात उडी घेतली. परंतु, ते गटांगळ्या खाऊ लागल्याने स्थानिक युवकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु ते चौघेही एकमेकांचे केस धरून असल्याने यातील दोघांना वाचविण्यात यश आले. तर दोघांचा या घटनेत मृत्यू झाला.
घटनेची माहिती सेलू पोलिसांना प्राप्त होताच पोलिस उपनिरीक्षक सुरेंद्र कोहळे हे आपले सहकारी कर्मचाऱ्यासह घटना स्थळावर पोहचून घटनेचा पंचनामा केला. मृतदेह शवबिच्छेदनासाठी ताब्यात सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात आणले. अधिकचा तपास सेलू पोलिस करीत आहे. या ठिकाणी जणू मृत्यूची शुंखला सुरू असून या चार वर्षांत पोहण्याच्या नादात जवळपास वीस तरुणांना आपले जीव गमवावे लागले. अशा दुर्घटना नेहमीच घडत असताना त्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था पुरविण्याकडे दुर्लक्ष जात आहे. या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था देणे गरजेचे आहे.