

वर्धा : साळीची हत्या करणाऱ्या आरोपीस जन्मठेपेसह दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली. हा निकाल जिल्हा न्यायाधीश-२ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी दिला. समेध आनंद मून रा. टाकळी (चणा) असे शिक्षेस पात्र ठरलेल्या व्यक्तीचे नाव आहे.
समेध मून हा फिर्यादीचा जावई असून, तो दारू पिण्याच्या तसेच जुगार खेळण्याच्या सवयीचा असल्याने त्याच्याकडून पत्नीला पैशासाठी त्रास दिला जायचा. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध न्यायालयात प्रकरणसुद्धा सुरू होते. हेच प्रकरण मागे घेण्याच्या कारणावरून ७ सप्टेंबर २०१६ ला समेध व त्याच्या पत्नीत वाद झाला. आरोपी इतक्यावरच थांबला नाही तर त्याने त्याच्या पत्नीला बेदम मारहाण केली.
समेधची पत्नी सपना हिने या घटनेची माहिती तिच्या आईला घरी येऊन दिली. दरम्यान, आरोपी समेध याने तेथे येत शिवीगाळ करून सपनाची बहीण प्रेमिला हिला जीवे मारण्याची धमकी दिली. याच घटनेचा राग मनात धरून आरोपी याने रात्री ८.१५ वाजताच्या सुमारास फिर्यादीच्या घरी येऊन धारदार शस्त्राने प्रेमिला हिला जीवानिशी ठार केले.
याप्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलीस निरीक्षक सी. ए. मदने यांनी संपूर्ण तपास पूर्ण करून प्रकरण न्यायप्रविष्ट केले. न्यायालयात याप्रकरणी एकूण ११ साक्षीदारांची साक्ष तपासण्यात आली. दोन्ही बाजूचा युक्तिवाद आणि पुराव्याच्या आधारे न्यायाधीश आर. व्ही. आदोने यांनी आरोपी समेध याला भादंविच्या कलम 3०२ अन्वये जन्मठेप व १५ हजार रुपये दंड तसेच दंड न भरल्यास सहा महिन्याच्या साध्या कारावासाची शिक्षा ठोठाविली. शासकीय बाजू अँड. गिरीश व्ही. तकवाले यांनी मांडली, तर पैरवी अधिकारी म्हणून समीर कडबे यांनी काम पाहिले.