

वर्धा : भावाच्या घरी रक्षाबंधनाच्या दिवशी आलेल्या बहिणीची बॅग रस्त्यावर पडली. बॅगमध्ये 3८ ग्रॅम सोने आणि रक्कमही होती. मात्र, एका चोरट्याने बॅगमधील दागिने काढून घेतले. ही बाब सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली. मात्र, रामनगर पोलिसांनी त्याची तपासणी केली असता त्याच्याजवळ काहीही मिळून न आल्याने त्याला क्लिनचीट देत सोडून देण्यात आले. योग्य तपास न केल्यानेच चोरट्याला सोडून देण्यात आल्याने मला न्याय द्यावा, अशी मागणी रंजना चंपत वरघणे यांनी पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या निवेदनातून केली आहे.
रंजना वरघणे ही वायगाव निपाणी येथून आर्वीनाका परिसरात राहणारा तिचा भाऊ संजय उमाटे याच्याकडे जात होती. मात्र, संजयच्या घरासमोरच रंजनाची बॅग रस्त्यावर पडली. बॅगमध्ये 3 तोळ्यांचा चिकू हार, पाच ग्रॅमचे कानातले, सोन्याची अंगठी, १० हजार रुपये रोख रक्कम होती. दरम्यान, बाजूलाच मास्कचे दुकान लावणाऱ्या गजानन नामक व्यक्तीने ती बॅग उचलली आणि त्याच्या बंडीखाली ठेवली. त्या बॅगमधून सर्व दागिने त्याने काढून ती बॅग एका महिलेजवळ दिली.
ही सर्व त्याची हालचाल समोरच असलेल्या मेडीकल दुकानासमोरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. या घटनेची तक्रार रामनगर पोलिसांत दिली. पोलिसांनी घटनास्थळी येत तपासणी केली. मात्र, योग्य तपासणी न केल्यामुळे चोरट्यास सोडून दिल्याचा आरोप महिलेने केला आहे. या चोरीमुळे आर्थिक नुकसान झाले असून योग्य कारवाई करून न्याया द्यावा, अशी मागणी रंजना वरघणे यांनी निवेदनातून दिली आहे.