दोन मित्रांचा अपघातात जागीच मृत्यू! गावात शोकाकुल वातावरण

वर्धा : केळझर येथील दोन जिवलग मित्र दुचाकीने नागपूरवरून परत येत असताना आसोला (सावंगी) (जि. नागपूर) गावाजवळ भीषण अपघात झाला. अपघातात दोन्ही युवकांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना ही घटना बुधवार (ता. ९) मध्यरात्री १२.३० वाजताच्या सुमारास घडली. जगदीश सुनील साखरकर (२८), जयंत केशव मुजबैल (२६) असे मृत युवकांची नावे आहे.

जगदीश साखरकर यांचा ट्रान्सपाेर्टचा व्यवसाय आहे. वाहनांचे काही सुटे भाग आणण्यासाठी बुधवारी दुपारच्या सुमारास नागोसे नामक मित्राची एमएच-३२/एआर-८८५० क्रमांकाच्या दुचाकीने जयंत मुजबैले या मित्राला सोबत घेत जगदीश नागपूरला गेला होता. काम आटोपून गावाकडे परतीच्या प्रवासात उशिरा रात्री नागपूर जिल्ह्यातील आसोला (सावंगी) गावाजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात दोन्ही जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती केळझर गावात पसरताच गावात शोकाकुल वातावरण होते. गुरुवारी दोघांच्याही पार्थिवावर एकाचवेळी केळझर येथील मोक्षधामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here