घरमालकाचा लेकच निघाला चोर! भाडेकरूच्या घरातून ३३ हजारांची रोकड; पोलिसांनी ‘असा’ लावला चोरीच्या गुन्ह्याचा छडा

वर्धा : स्थानिक आनंदनगर भागात घडलेल्या रोकड चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात शहर पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील चोरटा दुसरा-तिसरा कुणी नसून घरमालकाचा मुलगाच निघाला असून, त्याच्याकडून पोलिसांनी चोरीची ३३ हजारांची रोकड हस्तगत केली आहे. सय्यद जमीर सय्यद शरीफ (रा. आनंदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

अनिस अहमद सौफी (२३) हे शरीफ भाई चक्की वाले (रा. आनंदनगर) यांच्या घरी किरायाने राहतात. ५ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० अनिस यांना ॲल्युमिनियमच्या खिडक्याचे काम मिळाले. काम देणाऱ्या मालकाने त्यांना ३३ हजार रुपये दिले. ते त्यांनी त्यांच्या घरातील गादी खाली ठेवले. दुसऱ्या दिवशी ते कामावर गेले आणि परतल्यावर घरात चोरी झाल्याचे निदर्शनास आले.

चोरट्याने घरातून तब्बल ३३ हजारांची रोख लंपास केल्याचे अनिस अहमद सौफी यांच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यानंतर अनिस यांनी शहर पोलीस स्टेशन गाठून तक्रार नोंदविली. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत भादंविच्या कलम ३८० अन्वये गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. तपासादरम्यान पोलिसांनी सय्यद जमीर सय्यद शरीफ यास ताब्यात घेत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडून पोलिसांनी चोरीचे ३३ हजारांची रोकड जप्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here