
वर्धा : माहेरी गेलेल्या पत्नीने गळफास घेत आत्महत्या केल्याची वार्ता कळताच पतीने कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. या घटनेमुळे देवळी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. पूजा रवी ठाकरे (३०) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे तर रवी ठाकरे (३०) असे पुरुषाचे नाव आहे.
पूजा ठाकरे या आठ दिवसापूर्वी त्यांच्या माहेरी सानेगाव (आबाजी) येथे गेल्या होत्या. पूजा यांनी त्यांच्या वडिलांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची वार्ता रवी ठाकरे यांना कळताच रवी यांनी तातडीने सानेगाव (आबाजी) गाव गाठले. पत्नीच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतल्यावर रवी यांनी केळापूर गाठले. केळापूर येथे पोहोचल्यावर रवी यांनी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली.
मृत पूजा व रवी यांना दोन वर्षीय मुलगा असून, या घटनेमुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली असून, या घटनेची नोंद पोलिसांनी घेतली आहे. रवी आणि पूजा यांनी आत्महत्येसारखा कठोर निर्णय का घेतला, याचा शोध सध्या पोलीस घेत आहेत.

















































