दक्ष महिलेने चोरट्यास दाखवला इंगा! हातचलाखीने रोकड पळविताच पाठलाग करून पकडले; ही घटना गिरड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली

वर्धा : पेरणीच्या कामासह खत खरेदीसाठी पैसे काढण्यासाठी बँकेत गेलेल्या महिलेला खोटी बतावणी करून तिच्या जवळील पाचशेच्या ५० नोटा घेवून पैसे मोजत असल्याचे भासवित तब्बल २१ नोटा हातचलाखीने पळविण्यात आल्या. पण ही बाब महिलेच्या लक्षात येताच महिलेने त्या गंडा घालणाऱ्याचा पाठलाग करून त्याला पकडले. शिवाय त्याच्याकडील पैसे परत घेत त्याला पोलिसांच्या स्वाधिन केले. ही घटना गिरड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखेत घडली.

नासिर आमिर अली (४०) असे आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले.पैसे काढण्यासाठी आलेल्या महिलेला पैसे मोजत असताना बघून नासिर याने ‘दिदी तुम्हासे पास कुछ नोट फटे हूए है ‘ असे म्हणत तिच्या हातातील संपूर्ण पैसे घेत पैसे मोजत असल्याचा आव आणला. पैसे मोजत असल्याचे भासवत असतानाच नासिर याने पाचशे रुपयांच्या ५० नोटांपैकी तब्बल २१ नोटा हातचलाखीने आपल्या जवळ ठेवून घेतल्या. शिवाय मोठ्या हूशारीने बँकेबाहेर पळ काढला. दरम्यान बँकेतून काढलेल्या पैशाच्या तुलनेत आपल्याकडे असलेली रक्कम कमी असल्याचे लक्षात येताच महिलेने तिच्या शेजारी असलेल्यांना आपले पैसे मोजून देणारा व्यक्ती कुठे गेल्याचे विचारणा केली. शिवाय तातडीने बँकेबाहेर येत चोरट्याचा शोध घेतला.

दरम्यान रस्त्याच्या कडेला नासिर हा दिसला. तो बँकेबाहेरून पळ काढण्याच्या प्रयत्नात असतानाच महिलेने नासिरला ताब्यात घेतले. दरम्यान नासिरच्या दोन साथीदारांनी दुचाकीने पळ काढला. महिलेने नासिर याचा चांगलाच समाराच घेत आपले पैसे परत घेतले. शिवाय त्याला गिरड पोलिसांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी गिरड पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद घेत त्याला अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here