

वर्धा : तालुक्यातील पिंपळगाव येथील शेतकरी दाम्पत्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन केले होते. महिनाभरापासून रुग्णालयात उपचार सुरू असताना शेतकरी राजेंद्र चरडे यांचा बुधवारी मृत्यू झाला. तर पत्नीच्या तब्येतीत सुधारणा झाल्याने तिला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. सदर शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यामुळे परिवार उघड्यावर आला आहे. त्यामुळे शेतकरी कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे.
अर्चना राजेंद्र चरडे यांनी आणि त्यांचे पती राजेंद्र चरडे यांनी 9 जानेवारीला संध्याकाळी राहत्या घरी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दोघांनी विष घेतल्याची माहिती मिळताच त्यांना सेवाग्राम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात पती-पत्नी दोघांवर उपचार करण्यात आले. काही दिवसांत पत्नीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मात्र, प्रक्रती खाळावल्याने एका महिन्यानंतर राजेंद्र चरडे यांचा मुत्यू झाला. राजेंद्र यांच्याकडे दोन एकर शेती असल्याने दोन मुलींना घेऊन उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न मृतकाच्या पत्नीसमोर आहे. राजेंद्र चरडे यांनी सेवाग्राम येथील सेंट्रल बँकेकडून 70 हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. तसेच खासगी सावकाराचेही कर्ज असल्याचे कळते. तर त्यांच्या पत्नीनेही वाने गटाकडून कर्ज काढले होते. शेतीतून होणारे उत्पन्न कमी असल्याने कुटूंब चालवून कर्ज कसे फेडाय या विवंचनेतून शेतक-याने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे.