

आर्वी : आर्वी तालुक्यातील नांदपूर येथे एका ६० वर्षीय व्यक्तीला चक्क जिवंत जाळून त्याची हत्या करण्यात आली. ही घटना सोमवारी दुपारी घडली असून, अभिमान पखाले (रा. नांदपूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या घटनेची आर्वी पोलिसांनी नोंद घेतली असून, अधिक चौकशीसाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. क्षुल्लक वाद विकोपाला जाऊन ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पण सखोल चौकशीअंती या प्रकरणातील वास्तव पुढे येणार आहे.
अभिमान हा मद्यपी होता. सोमवारी दुपारी तो गावातच एका दारू विक्रेत्याकडे दारू पिण्यासाठी गेला असता, तेथे त्याचा क्षुल्लक कारणावरून वाद झाला. हाच वाद विकोपाला जाऊन त्याला जिवंत जाळण्यात आल्याची चर्चा सध्या परिसरात रंगत आहे. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंके, ठाणेदार भानुदास पिदूरकर यांनी घटनास्थळ गाठून पाहणी केली व पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठविला.