एस.टी.ने प्रवास करताय, सॅनिटायझर घेतलाय ना? कोरोनाचे संकट अद्याप कायम! नियमांचे काटेकोरपणे पालन गरजेचे

वर्धा : कोरोना पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर तब्बल दीड महिन्यानंतर एस.टी. बसेसच्या फेऱ्या सुरू झाल्या आहेत. मार्च महिन्यापासून यंदाही कोरोनाने थैमान घातल्याने अनलॉकनंतर सुरुवातीच्या दोन-तीन दिवसांत प्रवाशांचा अल्प प्रतिसाद दिसून येत आहे. अद्याप कोरोनाची भीती कायम असल्याने प्रवास करताय तर सॅनिटायझर घेतलाय ना? असा प्रश्न चालक-वाहकांकडून प्रवाशांना विचारला जात आहे.

यंदा मार्चपासून कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेखही चढताच राहिला. परिणामी, ८ पासून ३१ मेपर्यंत जिल्ह्यात लॉकडाऊनअंतर्गत कडक निर्बंध घालण्यात आले. या काळात केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. धावत होती. दीड महिन्याच्या कालावधीत एस.टी.चे उत्पन्न केवळ एक ते दोन हजार रुपये होते. वर्धा विभागांतर्गत वर्धा, आर्वी, हिंगणघाट, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) अशी एकूण पाच आगारे असून, एकूण २२८ बसेस आहेत. आता अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सरासरी २५ बसेस धावत आहेत. सध्या २५ वाहक आणि २५ चालक सेवा देत आहेत. सर्वाधिक प्रवासी वाहतूक पुलगाव-वर्धा, हिंगणघाट-वर्धा, वर्धा-नागपूर या मार्गांवर असून, प्रत्येक फेरीवेळी संबंधित आगाराकडून बसगाड्या सॅनिटाईज केल्या जात आहेत. एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत असली तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे काटेकोरपणे पालन केले जात आहे. वेळोवेळी बसगाड्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

ना मास्क, ना सॅनिटायझर

कोरोनाचे संकट तीव्र झाले असताना अनेक प्रवासी मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताना दिसत नाहीत. त्यामुळे अशा प्रवाशांना एस.टी.तून प्रवास करण्यास मनाई केली जात आहे. परिणामी, बहुतांश वेळी प्रवासी आणि चालक-वाहकांत वादाचे प्रसंग उद्भवत आहेत.

उत्पन्नाला लाखो रुपयांचा फटका

मार्च महिन्यापासून कोरोनाने कहर केल्याने केवळ अत्यावश्यक सेवेसाठी एस.टी. बसेस धावत होत्या. त्यामुळे महामंडळाच्या वाहतूक उत्पन्नाला मोठा आर्थिक फटका बसला. डिझेलचा खर्च करणेही महामंडळाला या काळात न परवडणारे झाले होते.

प्रवासी घरातच

मार्च आणि एप्रिल महिन्यांत कोरोनाच्या संसर्गाने कहर केला. कोरोनाबाधित रुग्णसंख्या आणि मृत्युसंख्येचा आलेख चढताच राहिला. त्यामुळे नागरिकांत अद्याप कोरोनाची भीती कायम आहे. त्यामुळे अनेकजण प्रवास टाळत असून घरातच राहणे पसंत करीत आहेत.

एस.टी.ची सर्वाधिक वाहतूक नागपूर मार्गावर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आले. दरम्यानच्या काळात एस.टी. अत्यावश्यक सेवेसाठी धावत होती. दीड महिन्यानंतर एस.टी. पूर्ण क्षमतेने धावत आहे.

रोज जिल्ह्यातील वर्धा, हिंगणघाट, आर्वी, पुलगाव, तळेगाव (श्यामजीपंत) आदी पाचही आगारे मिळून सरासरी २५ बसेस धावत आहेत.जिल्ह्यात प्रवाशांचा एस.टी.ला अल्प प्रतिसाद असला तरी वर्धा-नागपूर, हिंगणघाट-वर्धा आणि पुलगाव-वर्धा या मार्गांवर सर्वाधिक प्रवासी वाहतूक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here