

वर्धा : मैत्रेय प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने प्लॉट खरेदीच्या नावाखाली गुंतवणूक करून गुंतवणूकदारांची तसेच सुवर्ण सिद्धी योजनेच्या नावावर जिल्ह्यातील नागरिकांची तब्बल १८ कोटी ५१ लाख ६७ हजार ९२९७ रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे उघडकीस आले होते. याप्रकरणात मैत्रेय कंपनीविरुद्ध तब्बल ८ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे.
पाच ते सहा वर्षांपूर्वी मैत्रेय कंपनीने वर्धा शहरात शाखा उघडली. मोठे कार्यालय थाटले. मैत्रेय प्लॉटर्स आणि सुवर्णसिद्धी योजनेखाली मैत्रेय कंपनीचे आरोपी अमोघ दळवी, लक्ष्मीकांत नार्वेकर आणि विजय तावडे यांनी नागरिकांना आमिष दाखवून प्लॉट खरेदीच्या नावाखाली आकर्षक योजना बाजारात आणल्या. जिल्ह्यातील १७ हजार १६२ गुंतवणूकदारांनी प्लॉट खरेदीत गुंतवणूक केली तर ७ हजार ७२ गुंतवणूक दारांनी सुवर्णसिद्धी योजनेत गुंतवणूक केली. गुंतविलेल्या पैशाची मुदत पूर्ण झाली. आता प्लॉट मिळेल, दुप्पट, तिप्पट रक्कम मिळेल या आशेने गुंतवणूकदार कंपनीच्या कार्यालयात गेले त्यांना धनादेशही देण्यात आले. मात्र, धनादेश न वटता परत आले. अशी जवळपास गुंतवणूकदारांकहून तब्बल १८ कोटी ५१ लाख ६७ हजारांची रक्कम उकळून गुंतवणूक दारांची फसवणूक केली.
आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास सोपविण्यात आला होता. तपास पूर्ण झाल्याने तब्बल ८ हजार पानांचे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी आबुराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनात आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सचिन यादव, आशिष महेशगौरी, प्रतीक नगराळे, शैलेश भारशंकर, संतोष जयस्वाल, निकेश गजर, कृणाल डांगे करीत आहेत.