
पवनार : आठ व नऊ जुलै रोजी पवनार परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेकांच्या घरांना व मालमत्तेला मोठ्या प्रमाणात बाधा पोहोचली आहे. बाधित घरांना शासकीय निकषानुसार योग्य ती भरपाई मिळवून देण्यासाठी स्वतः पुढाकार घेऊन प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिले. राज्यमंत्री भोयर हे आज सकाळी वर्धा येथे नियोजित दौऱ्यावर जात असताना पवनार येथे थांबले. त्यांनी यावेळी ज्ञानेश्वर येरुणकर यांच्या पावसामुळे बाधित घराची पाहणी केली व कुटुंबियांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
याप्रसंगी शेतकरी विकास मंचचे अध्यक्ष सुरेश इखार यांनी पवनार परिसरातील शेत शिवारांना सौर कुंपण योजनेअंतर्गत अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी राज्यमंत्र्यांकडे केली. यावर उत्तर देताना भोयर यांनी, सदर प्रकरण सध्या मुंबई येथे सचिव स्तरावर मंजुरीसाठी प्रलंबित असल्याचे सांगत, लवकरच मंजुरी मिळवून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पवनार येथे शिव स्मारक उभारण्याच्या कामाला गती देण्यात येईल, असेही राज्यमंत्री भोयर यांनी यावेळी स्पष्ट केले.
राज्यमंत्री भोयर यांच्या या दौऱ्यामुळे पावसामुळे संकटात सापडलेल्या नागरिकांमध्ये काहीसा दिलासा निर्माण झाला आहे. प्रशासन व लोकप्रतिनिधीच्या संयुक्त प्रयत्नातून बाधितांना लवकरच मदतीचे हात मिळतील, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली. या दौऱ्यात उपविभागीय अधिकारी दीपक कारंडे, तहसीलदार संदीप पुंडेकर, मंडळ अधिकारी प्रवीण हाडे, ग्राम महसूल अधिकारी संजय भोयर, ग्राम विकास अधिकारी अजिनाथ डमाळे, माजी सरपंच शालिनी आदमाने, अजय गांडोळे, राहुल पाटणकर, राजू बावणे, सुरेश इखार, वासुदेव सावरकर, पिंपरीचे सरपंच अजय गौळकार, अजय वरटकर, प्रशांत भोयर, दिलीप ठोंबरे यांच्यासह अनेक मान्यवर व स्थानिक नागरिक उपस्थित होते.






















































