Home ◼️ संपादकीय विद्यार्थ्यांत विवेकी विचारसरणी रुजवण्यासाठी शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे उद्घाटन ; कमला नेहरू...

विद्यार्थ्यांत विवेकी विचारसरणी रुजवण्यासाठी शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे उद्घाटन ; कमला नेहरू विद्यालयात कार्यक्रम ! महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा पुढील टप्पा

वर्धा : विद्यार्थीदशेतच विवेकी विचारसरणी रुजवून भारतीय संविधानातील नागरिक कर्तव्यांची जाणीव करून देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने उभारलेल्या शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचा उद्घाटन सोहळा कमला नेहरू माध्यमिक विद्यालयात नुकताच उत्साहात पार पडला. महाराष्ट्रातील ६८ महाविद्यालयांमध्ये आधीपासून कार्यरत असलेल्या विवेक वाहिनीचा हा पुढील टप्पा असून, आता पाचवी ते बारावीच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी शालेय स्तरावर हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

उद्घाटनप्रसंगी मंचावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य प्रधान सचिव गजेंद्र सुरकार, शालेय महाराष्ट्र विवेक वाहिनीचे प्रमुख दिलीप गुळघाणे, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. मैथिली मुळे तसेच सर्वांना सक्तीचे व मोफत शिक्षण प्रबोधन चळवळीचे पत्रकार देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती. गजेंद्र सुरकार यांनी आपल्या मार्गदर्शनात भारतीय नागरिकांचे कर्तव्य आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावर सखोल विचार मांडले. “मन व शरीर निरोगी ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करणे, व्यसनांपासून दूर राहणे, बौद्धिक वाचन करणे, एक तरी खादीचा सदरा वापरून स्वातंत्र्यलढा व श्रमपरंपरेशी स्वतःला जोडणे ही विवेक वाहिनीच्या मूल्यांची खरी ओळख आहे,” असे ते म्हणाले.

दिलीप गुळघाणे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना श्रीमंत-मजूर, कष्टकरी यामधील भेदभाव स्पष्ट केला व श्रमाचे महत्त्व सांगताना, “आपण कोणाच्या किती कामी पडतो, हे जीवनातले खरे मूल्य आहे. हे मूल्य अंगीकारल्यासच आपली माणूस म्हणून ओळख निर्माण होते,” असे प्रतिपादन केले. त्यांनी साधी राहणी, पर्यावरण रक्षण, स्वभावातील बदल आणि अहिंसक विचारसरणी यावरही विद्यार्थ्यांशी हसत-खेळत संवाद साधला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वर्षा आदेवार यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. ममता वैरागडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी दीपाली गुळघाणे, वर्षा उईके, स्मिता खुजे, हेमलता नारायणे, विजया कातोरे, मनीषा करलुके यांनी विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!