Home ◼️ संपादकीय महात्मा फुले चित्ररथाचे वर्धा शहरात भव्य स्वागत

महात्मा फुले चित्ररथाचे वर्धा शहरात भव्य स्वागत

वर्धा : क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवानिमित्त तयार करण्यात आलेल्या विशेष चित्ररथाचे वर्धा शहरात उत्साहात व भव्य स्वागत करण्यात आले. समता, बंधुता, न्याय आणि ज्ञानाचा संदेश देणाऱ्या या चित्ररथाचे स्वागत अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद व शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत करण्यात आले.

केंद्र व राज्य शासनाच्या वतीने ११ एप्रिल २०२६ ते १० एप्रिल २०२७ या कालावधीत महात्मा फुले द्विशताब्दी जयंती वर्ष विविध उपक्रमांनी साजरे करण्यात येत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष व मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली, माजी खासदार व आमदार यांच्या संकल्पनेतून या भव्य चित्ररथाची निर्मिती करण्यात आली आहे.
चित्ररथामध्ये क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. यासोबतच समतेचे महामेरू छत्रपती शाहू महाराज आणि भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे साकारण्यात आले आहेत. महात्मा फुले लिखित पुस्तक, पेन आणि भिडेवाड्याची प्रतिकृती यांची प्रभावी मांडणी करून समाजप्रबोधनाचा संदेश देण्यात आला आहे.

हा चित्ररथ वर्धा शहरात दाखल झाल्यानंतर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आर्वी नाका येथे शहराचे प्रथम नागरिक डॉ. सुधीर पांगुळ यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. यावेळी विविध महामानवांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाला जिल्हाध्यक्ष विशाल हजारे, संघटक विनय डहाके, महिला जिल्हाध्यक्ष कविता मुगले, नगरसेवक सचिन होले, गोपी त्रिवेदी, बंटी खडसे, विक्रांत चौधरी, भरत चौधरी, डॉ. कपिल मून, भारती मसने, जयवंत भालेराव, अतुल गुल्हाने, निळकंठ राऊत, अशोक चोपडे, रोहिणी पाटील, सुनील कोपुलवार, प्रवीण पेठे, बाळाभाऊ माउसकर, सागर सभाने, राजेंद्र कळसाईत, कपिल थुटे, गजेंद्र सुरकार, शारदा झांबरे, पंकज इंगोले, डॉ. गवळी, आनंद अवथळे, हांडे तसेच शिव-शाहू-फुले-आंबेडकर प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Don`t copy text!