मत्स्य अधिकाऱ्यांचा अपघात! बोटितून उतरताना एकाचा मृत्यू चौघे बालंबाल बचावले; बोरधरण येथील घटना

वर्धा : मत्स्योद्योग विभागाचा एक अधिकारी व चार कर्मचारी बोरधरण परिसरात असलेल्या केजची तपासणी करण्यासाठी गेले. मात्र, तपासणी आटोपून ते परत केज परिसराकडे जात असताना बोटीतून उतरताना झालेल्या अपघातात प्रशासकीय अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर चौघे कर्मचारी थोडक्यात बचावले. ही घटना सेलू तालुक्यातील बोरधरण परिसरात १८ रोजी रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. त्यामुळे रात्रीची ही तपासणी चांगलीच चर्चेत आली असून मत्स्य विभागात एकच खळबळ उडाली आहे.

युवराज खेमचंद फिरके (५३ रा. ठाणे, मुंबई ह.मु. नागपूर) असे मृतक प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, मृतक प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके यांच्यासह मत्स्य निरीक्षक सुनिल भिमराव ठाकरे (५७ रा. नागपूर), विभागीय व्यवस्थापक बंसी योगीराम गहाट (५८ रा. औरंगाबाद ह.मु. नागपूर), मयंक विजयसिंग ठाकूर (४० रा.गाझीयाबाद ह.मु. नागपूर ), सहायक मत्स्य विकास अधिकारी योगेश मोहनलाल कठाणे (३४ रा. बल्लारशह ह.मु. नागपूर) असे पाच अधिकारी बोर धरण येथील केजची तपासणी करण्यासाठी नागपूर येथून आले होते.

रात्रीला जवळपास ८ वाजेनंतर त्यांनी तपासणीला सुरुवात केली आणि ते तपासणी करुन ९ वाजताच्या सुमारास परत केजकडे जात असताना बोटीवरून प्लॅटफॉर्मवर उतरत असताना तेथील प्लास्टीकच्या ड्रमवरुन पाचही जणांचा पाय घसरल्याने ते नदीपात्रात पडले. चौघांनी लगतच असलेल्या दोराला पकडल्यामुळे त्यांचा जीव वाचला पण नागपूर येथील मत्स्य विभागाचे प्रशासकीय अधिकारी युवराज फिरके हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला. रात्री उशिरापर्यंत धरणाच्या पाण्यात खोलवर फसलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले पण, काळोख असल्याने शोध लागू शकला नाही. घटनास्थळी सेलू पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक तिरुपती राणे हे रात्रीलाच कर्मचाऱ्यांसह दाखल झाले. रविवारी सकाळीच नागपूर येथील राज्य आपत्ती निवारण दलाच्या चमूंनी धाव घेतली असून धरणातील पाण्यात मृतक युवराज फिरके यांचा शोध सुरु केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here